पिंपरी चिंचवड (क्रांतीकुमार कडुलकर): चाकण औद्योगिक क्षेत्रातील कामगारांचे प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत चालले असून, कामगार आयुक्त आणि सहाय्यक कामगार आयुक्तांनी याकडे तातडीने लक्ष देण्याची गरज आहे, असे स्पष्ट मत स्वाभिमानी श्रमिक कामगार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष जीवन येळवंडे यांनी व्यक्त केले आहे.
पूर्वी पिंपरी चिंचवडचा औद्योगिक परिसर कामगार आणि कंपन्यांसाठी ओळखला जात होता आणि म्हणूनच वाकडेवाडी येथे कामगार आयुक्त कार्यालय कार्यरत होते. मात्र, २००० साली चाकण MIDC ची स्थापना झाल्यानंतर येथे ४५० हून अधिक मोठ्या आणि शेकडो लहान कंपन्या सुरू झाल्या. आज २५ वर्षे उलटून गेली तरी, चाकण MIDC मध्ये कामगारांसाठी आवश्यक असलेल्या मूलभूत सुविधांचा अभाव आहे, याकडे येळवंडे यांनी लक्ष वेधले.

चाकणमध्ये ESIS (कर्मचारी राज्य विमा योजना) चे सुसज्ज रुग्णालय नाही. मोठ्या कारखान्यांमध्ये ठेकेदारी, स्थलांतरित आणि रोजंदारी कामगार मोठ्या संख्येने काम करतात. त्यांची योग्य नोंदणी करणे, त्यांच्या समस्या व तक्रारी जाणून घेणे आणि त्यांना कायद्यानुसार किमान वेतन, ESIS, साप्ताहिक सुट्ट्या यांसारख्या सुविधा मिळतात की नाही, हे पाहणे कामगार आयुक्तांच्या अखत्यारीत येते. मात्र, याकडे पुरेशा प्रमाणात लक्ष दिले जात नसल्याची खंत येळवंडे यांनी व्यक्त केली.
अपघात झाल्यास, जखमी कामगारांना पिंपरी चिंचवड येथील महापालिका रुग्णालय किंवा तुटपुंज्या सुविधा असलेल्या चिंचवडमधील ESIS रुग्णालयात घेऊन जावे लागते. अनेक कंपन्या ठेकेदार आणि कंत्राटी कामगारांमार्फत कामे करून घेतात, ज्यामुळे या कामगारांची जबाबदारी मूळ कंपनी घेत नाही. असंघटित कामगारांना अनेकदा भोजन आणि नाश्त्याची व्यवस्थाही मिळत नाही. आजही लाखो कामगार केवळ १२ ते १५ हजार रुपयांच्या तुटपुंज्या पगारात काम करत आहेत. त्यांना बस, रुग्णालय आणि आरोग्य सुविधांचा अभाव आहे. अनेक ठिकाणी महिला कामगारांना पाळणाघराची सोय नसल्यामुळे गैरसोयीचा सामना करावा लागतो. सुट्टीच्या दिवशी कामाला बोलावले जाते आणि मासिक पाळीच्या रजा नाकारल्या जातात, असे गंभीर आरोप येळवंडे यांनी केले.

आज चाकण औद्योगिक क्षेत्रात चांगल्या दर्जाचे रस्ते, कामगार आयुक्त कार्यालय आणि कामगारांसाठी सुसज्ज ओपीडी तसेच कॉर्पोरेट दर्जाच्या सुविधा नसल्यामुळे कामगार आणि उद्योजक दोघांनाही अडचणी येत आहेत. येथे ठेकेदार आणि स्थलांतरित कामगारांची संख्या मोठी आहे. त्यामुळे राज्य आणि केंद्र सरकारने तातडीने या ठिकाणी कामगार आयुक्त कार्यालय आणि सर्व सोयींनी युक्त मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल स्थापन करावे, अशी मागणी जीवन येळवंडे यांनी माध्यमांशी बोलताना केली आहे.
#चाकणMIDC #कामगार #जीवनयेळवंडे #स्वाभिमानीश्रमिककामगारसंघटन #कामगारआयुक्त #ESISरुग्णालय #ठेकेदारी #असंघटितकामगार #मूलभूतसुविधा #औद्योगिकविकास #पिंपरीचिंचवड
