मोशी-आळंदीतील कत्तलखाना आरक्षण रद्द; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा, वारकरी आणि भूमिपुत्रांना मोठा दिलासा!
“श्रद्धेच्या बाबतीत कोणतीही तडजोड नाही”; आमदार महेश लांडगे यांच्या पाठपुराव्याला यश, संत तुकाराम आणि ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी दर्शनानंतर मुख्यमंत्र्यांचा निर्णय!
पुणे, दि. २१ जून २०२५ (मॅक्स मंथन डेली न्यूज): पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या सुधारित विकास आराखड्यात मोशी आणि तीर्थक्षेत्र आळंदीच्या परिसरातील प्रस्तावित केलेले कत्तलखान्याचे आरक्षण अखेर रद्द करण्यात येणार आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज (शनिवार, २१ जून) ही महत्त्वपूर्ण घोषणा केली. वारकरी, भूमिपुत्र आणि शेतकऱ्यांच्या श्रद्धेच्या बाबतीत कोणतीही तडजोड केली जाणार नाही, असे ठामपणे सांगत मुख्यमंत्र्यांनी सर्वसामान्यांना मोठा दिलासा दिला आहे.
पालखी दर्शनानंतर मुख्यमंत्र्यांचा महत्त्वाचा निर्णय
संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज आणि जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांचा आषाढी वारी पायी पालखी सोहळा पुण्यात दाखल झाला आहे. या ठिकाणी मुख्यमंत्री फडणवीस यांनी दोन्ही पालख्यांचे दर्शन घेतले आणि वारकऱ्यांशी संवाद साधला. याचवेळी त्यांनी कत्तलखाना आरक्षण रद्द करण्याच्या निर्णयाची घोषणा केली.
दोन दिवसांपूर्वी पिंपरी-चिंचवडमध्ये झालेल्या विविध विकासकामांचे भूमिपूजन आणि लोकार्पण कार्यक्रमात मोशी येथील प्रस्तावित कत्तलखाना आरक्षण रद्द करण्याबाबत ग्रामस्थ आणि भूमिपुत्रांनी मुख्यमंत्र्यांना निवेदन दिले होते. तसेच, भोसरीचे भाजपा आमदार महेश लांडगे यांनीही महापालिका आयुक्त शेखर सिंह आणि मुख्यमंत्र्यांकडे या आरक्षणाबाबत मागणी केली होती. मोशी, चऱ्होलीच्या नागरिकांची निवेदने स्वीकारून त्यावर सकारात्मक निर्णय घेण्याची साकडे आमदार लांडगे यांनी घातले होते, ज्याला अखेर आज यश मिळाले आहे.
आळंदीच्या पावित्र्याचा प्रश्न, व्यापक नाराजी
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या हद्दीमध्ये, आळंदी शहराच्या अगदी जवळ कत्तलखाण्याचे आरक्षण विकास आराखड्यामध्ये टाकण्यात आले होते. श्रीक्षेत्र आळंदीसारख्या देवस्थानाच्या परिसरामध्ये अशा पद्धतीने कत्तलखाण्याचे आरक्षण टाकण्यात आल्याने त्याबाबत सर्व स्तरातून तीव्र नाराजी व्यक्त झाली होती. प्रशासनाने सदर आरक्षण हटवावे, यासाठी आमदार लांडगे यांनी सातत्याने पाठपुरावा सुरू केला होता.
“कुठल्याही परिस्थितीत कत्तलखाना होणार नाही” – मुख्यमंत्री फडणवीस
पुण्यामध्ये माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले, “जो काही विकास आराखडा आहे, त्या विकास आराखड्यामध्ये मोशी-आळंदी येथे कत्तलखाण्याचे आरक्षण दाखवण्यात आले आहे. मात्र, कुठल्याही परिस्थितीमध्ये कत्तलखाना होऊ दिला जाणार नाही. त्याबाबतचे आरक्षण वगळण्याच्या आदेश मी दिले आहेत. वारकऱ्यांना आणि वारकरी नेत्यांना सांगू इच्छितो की, कोणत्याही परिस्थितीत कत्तलखाना होणार नाही.”
देव, देश, धर्मासाठी काम करणारे सरकार: आमदार महेश लांडगे
या निर्णयावर प्रतिक्रिया देताना आमदार महेश लांडगे यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांचे मनापासून आभार मानले. ते म्हणाले, “देव-देश आणि धर्मासाठी काम करणारे भाजपा महायुतीचे सरकार राज्यात, केंद्रात आहे. गोरक्षण आणि गोसंवर्धनासाठी गोहत्या बंदीचा कायदा राज्यात लागू करण्याची भूमिकाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली.”
लांडगे यांनी यावेळी मुख्यमंत्र्यांनी ताळगाव चिखली येथील टीपी स्कीम रद्द करणे आणि मौजे चऱ्होली येथील टीपी स्कीमला स्थगिती दिल्याचेही नमूद केले. त्यावर काही लोकांनी संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न केला असतानाही मुख्यमंत्र्यांनी जाहीर कार्यक्रमात एका मिनिटात प्रश्न मार्गी लावला. मोशी ग्रामस्थ, गोरक्षक आणि हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी कत्तलखाना आरक्षण रद्द करण्याची मागणी केली होती, ती मागणी पूर्ण झाल्याबद्दल आमदार लांडगे यांनी तमाम गोरक्षण, गोसंवर्धक आणि शेतकरी यांच्यासह सकल हिंदू समाजाच्या वतीने मुख्यमंत्र्यांचे आभार व्यक्त केले.
या निर्णयामुळे पिंपरी-चिंचवड आणि आळंदी परिसरातील नागरिक तसेच वारकरी संप्रदायाला मोठा दिलासा मिळाला आहे.
© २०२५ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.
