news
Home पिंपरी चिंचवड जाणता राजा’ मैदानात: शरद पवारांनी फडणवीसांना डिवचले, शक्तीपीठ महामार्ग व हिंदी सक्तीवर भूमिका मांडली!

जाणता राजा’ मैदानात: शरद पवारांनी फडणवीसांना डिवचले, शक्तीपीठ महामार्ग व हिंदी सक्तीवर भूमिका मांडली!

शेतकऱ्यांचे हित पाहूनच निर्णय घेणार; लहान मुलांवर भाषेचा अवास्तव ताण नको - पवारांची स्पष्टोक्ती. (मॅक्स मंथन डेली न्यूज)

by maxmanthannews@gmail.com
Spread the love

 

“फडणवीसांच्या धमकीमुळे आमची झोप उडाली!”; खासदार शरद पवारांचा खोचक टोला, ‘शक्तीपीठ महामार्गा’वर आणि ‘हिंदी सक्ती’वर स्पष्ट भूमिका!

 

 

‘आधी प्रकल्प समजून घेईन, मगच विरोध की पाठिंबा’; हिंदी पाचवीपर्यंत सक्तीची नको, पण त्यानंतर हरकत नाही – पवारांचे मत!

 

, दि. २७ जून २०२५ (मॅक्स मंथन डेली न्यूज): महाराष्ट्राच्या राजकारणात ‘जाणता राजा’ म्हणून ओळखले जाणारे खासदार शरद पवार यांनी आज पिंपरी-चिंचवडमध्ये अनेक महत्त्वाच्या राजकीय आणि सामाजिक मुद्द्यांवर आपली परखड मते मांडली. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ‘याद राखा’ या इशाऱ्याला त्यांनी “देवेंद्र फडणवीसांच्या धमकीमुळे आमची झोप उडाली आहे,” असा खोचक टोला लगावत प्रत्युत्तर दिले. याचवेळी त्यांनी बहुचर्चित शक्तीपीठ महामार्ग आणि त्रि-भाषा सूत्रातील हिंदी सक्तीच्या मुद्द्यावरही आपली भूमिका स्पष्ट केली.


 

‘शक्तीपीठ महामार्गा’वर पवारांची सावध भूमिका: “आधी समजून घेईन!”

 

शक्तीपीठ महामार्गाच्या प्रकल्पावरून सुरू असलेल्या वादावर बोलताना शरद पवारांनी कोणतीही घाईची भूमिका घेण्याचे टाळले. ते म्हणाले, “शक्तीपीठ महामार्गाचा विषय मला समजून घ्यायचा आहे. कोल्हापूरच्या लोकांबरोबर मी बोलणार आहे. त्यानंतर राज्य सरकारने आम्हा लोकांना त्याची माहिती देण्याची तयारी दाखवली तर तेही समजून घेण्याचा माझा विचार आहे.”

फडणवीसांच्या इशाऱ्यावर त्यांनी उपरोधिकपणे, “आता आमचं कसं व्हायचं?” असा प्रश्न विचारला. “हा प्रकल्प काय आहे? याची आवश्यकता आहे का? हे आधी मी समजून घेईन. त्यासाठी सरकारने आम्हाला माहिती दिली तर ती देखील मी घेणार आहे. त्या भागातला शेतकऱ्यांच्या जमिनी घेतल्या जातात, त्या भागातले लोकप्रतिनिधी जे जाहीर बोलतायेत त्यांची मतं आणि त्यांचा आग्रह हा समजून घ्यावा लागेल. मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही,” असे स्पष्ट करत त्यांनी शेतकऱ्यांचे आणि लोकप्रतिनिधींचे म्हणणे ऐकूनच निर्णय घेणार असल्याचे सूचित केले.


 

‘हिंदी सक्ती’वर पवारांचे मध्यममार्गी मत: “पाचवीपर्यंत नको, नंतर हरकत नाही!”

 

शिक्षण धोरणातील त्रि-भाषा सूत्रांतर्गत हिंदी भाषेच्या सक्तीवरून सुरू असलेल्या चर्चेवरही शरद पवारांनी भाष्य केले. त्यांनी ठाकरे बंधूंनी (राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे) घेतलेल्या भूमिकेचे समर्थन केले. “ठाकरे बंधु जे बोलतात त्यांचे स्टेटमेंट काही चुकीचं नाही. त्यामध्ये, कोणत्या स्टेजला हिंदी हवी आणि नको ह्या दोन्ही गोष्टी सांगितल्या आहेत,” असे ते म्हणाले.

पवारांच्या मते, “माझ्यामते या सगळ्यांचा जो आग्रह आहे तो, प्राथमिक शिक्षणात हिंदी सक्तीची करू नये असा आहे. ५ वीच्या नंतर हिंदी शिकायला काही हरकत नाही. देशातील एक मोठा वर्ग हिंदी भाषा बोलतो, त्यामुळे हिंदी भाषेला एकदमच साईडचं समजण्याचं कारण नाही.”

मात्र, लहान मुलांवर भाषेचा अवास्तव ताण येऊ नये, यावर त्यांनी भर दिला. “लहान मुलांच्या एका विशिष्ट वयामध्ये किती भाषा ते आत्मसात करू शकतात, त्यांच्यावर किती भाषांचा लोड टाकावा लागेल याचा देखील विचार करावा लागेल. दुसऱ्या भाषेचा लोड टाकला आणि मातृभाषा बाजूला पडली तर हे योग्य नाही, म्हणून ५ वी पर्यंतच्या हिंदी भाषेचा हट्ट सरकारने सोडावा.” मराठी भाषेच्या मुद्द्यावर एकत्र येण्याची भूमिका घेतली जात असेल तर ती मातृभाषेच्या दृष्टीने चांगली गोष्ट असल्याचेही त्यांनी नमूद केले.


© २०२५ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!