‘ब्राह्मण समाजाने उद्योगात ठसा उमटवावा’: ‘बिटो’ परिषदेत उद्योजकांचा सूर; दिग्गज व्यावसायिकांकडून मोलाचे मार्गदर्शन!
पुण्यात ‘ब्राह्मण इंडस्ट्रियल अँड ट्रेडर्स ऑर्गनायझेशन’ परिषदेला भरभरून प्रतिसाद; ‘नोकरीऐवजी व्यवसायात या’ – आनंद दवे यांचे आवाहन!
पुणे, दि. २८ जून २०२५ (मॅक्स मंथन डेली न्यूज): ब्राह्मण महासंघ संचालित ‘ब्राह्मण इंडस्ट्रियल अँड ट्रेडर्स ऑर्गनायझेशन’ (BITO – बिटो) च्या वतीने शनिवारी सायंकाळी पुण्यात आयोजित उद्योजक परिषदेला भरभरून प्रतिसाद मिळाला. या परिषदेत ‘ब्राह्मण समाजाने उद्योगात आपला ठसा उमटवावा’ असा महत्त्वाचा सूर उमटला. ज्येष्ठ उद्योजक, सिटी कॉर्पोरेशनचे व्यवस्थापकीय संचालक अनिरुद्ध देशपांडे आणि ज्येष्ठ बांधकाम व्यावसायिक दिलीप कोटीभास्कर हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
दिग्गज उद्योजकांचे मार्गदर्शन आणि संवाद
या परिषदेत अनिरुद्ध देशपांडे, दिलीप कोटीभास्कर, अजित कुलकर्णी, सुरेश दाबक, पिनाक वाघ, राहुल पंडित आणि कपिलेश भाट्ये या बांधकाम क्षेत्रातील मान्यवरांनी प्रकट मुलाखतीद्वारे उपस्थितांशी संवाद साधला. विविध क्षेत्रातील उद्योजक आणि व्यावसायिकांनी आपापल्या व्यवसायविषयक सादरीकरणे केली.
अनिरुद्ध देशपांडे यांनी आपल्या मार्गदर्शनात सांगितले की, “क्रीडा क्षेत्रामुळे दिग्गज मंडळींशी संबंध आला. त्यामुळे ब्राह्मण व्यावसायिकांनी असे मानू नये की संपर्क साधणे अवघड असते. आपल्या उद्दिष्ट्यावर लक्ष केंद्रित करावे, वेळ वाया घालवू नये. इतर व्यापारी समाजातील व्यक्ती व्यवसायासाठी परगावात जायला तयार असतात. आपण देखील परगावात व्यवसाय करण्याची तयारी ठेवली पाहिजे.”
दिलीप कोटीभास्कर यांनी, “आपण विविध विषयांवर राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर काम करता आले पाहिजे,” असे आवाहन केले. बांधकाम व्यावसायिक अजित कुलकर्णी म्हणाले, “खिशात काहीही पैसे नसतानाही व्यवसाय करता येतो. अक्कलहुशारीने पुढे जाता आले पाहिजे. जिद्द, चिकाटी असली पाहिजे.”
सुरेश दाबक यांनी बांधकाम व्यवसायाला उद्योगाचा दर्जा मिळणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त केले. ते म्हणाले, “कमी मनुष्यबळात काम करता आले पाहिजे. मराठी मनुष्यबळ या व्यवसायात आले पाहिजे.” पिनाक वाघ यांनी ‘विविध आदर्श डोळ्यासमोर असतील तर मार्ग सुकर होतो,’ असे सांगितले, तर कपिलेश भाट्ये यांनी ‘चांगले भागीदार मिळणे ही महत्त्वाची गोष्ट ठरते,’ असे मत मांडले.
‘नोकरीच्या मागे न लागता व्यवसायात या’: आनंद दवे यांचे आवाहन
‘बिटो’चे संस्थापक अध्यक्ष आनंद दवे यांनी संस्थेच्या कार्याची माहिती दिली. ते म्हणाले, “ब्राह्मण समाजाने नोकरीच्या मागे न लागता व्यवसायात पुढे जावे. इतर समाजाशी स्पर्धा न करता स्वतःचा ठसा उमटवावा. एकमेकांना मदत करत पुढे गेले पाहिजे.”
कार्यक्रमाची सुरुवात मनोज तारे यांच्या स्वागतपर भाषणाने झाली. नाना अभ्यंकर यांनी प्रस्तावित ब्राह्मण चेंबर्सचे नियोजन मांडले. मेघा म्हसवडे आणि आदिती जोशी यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. अॅड. निता जोशी, संदीप जोशी, अभिषेक जोशी, अविनाश कुलकर्णी, प्रवीण शिरसीकर, संजय देशमुख, नाना भांगे, सुधीर दाबके, अजित कुलकर्णी, तृप्ती तारे, महेंद्र मणेरीकर आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते. नितीन शुक्ल यांनी उपस्थितांचे आभार मानले.
© २०२५ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.