पिंपरी-चिंचवड मनपाच्या ‘मॅस्कॉट डिझाइन’ स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद!
‘स्वच्छतेचा नवा चेहरा’ शोधण्यासाठी स्पर्धेची अंतिम मुदत १३ ऑगस्टपर्यंत वाढवली
पिंपरी, दि. ७ ऑगस्ट २०२५: पिंपरी-चिंचवड शहराला स्वच्छ सर्वेक्षण २०२५-२६ मध्ये राष्ट्रीय स्तरावर सर्वोच्च स्थान मिळवून देण्याच्या ध्येयाने पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने एक अनोखा उपक्रम हाती घेतला आहे. महापालिकेच्या आरोग्य विभागाने ‘स्वच्छतेचा नवा चेहरा’ शोधण्यासाठी आयोजित केलेल्या मॅस्कॉट डिझाइन स्पर्धेला शहरातील डिझाइन व्यावसायिक, विद्यार्थी आणि नागरिकांकडून भरभरून प्रतिसाद मिळत आहे. वाढता सहभाग लक्षात घेता, या स्पर्धेमध्ये सहभागी होण्याची अंतिम मुदत आता १३ ऑगस्ट २०२५ पर्यंत वाढवण्यात आली आहे. जास्तीत जास्त नागरिकांनी या स्पर्धेत सहभागी व्हावे, असे आवाहन आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी केले आहे.
स्पर्धेचा उद्देश आणि संकल्पना
स्वच्छ सर्वेक्षण २०२४-२५ मध्ये शहराने केलेल्या कामगिरीची दखल घेऊन, आता पुढील वर्षासाठी तयारी सुरू झाली आहे. नागरिकांच्या कल्पकतेला चालना देण्यासाठी आणि स्वच्छतेच्या चळवळीत त्यांना सहभागी करून घेण्यासाठी या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेतील निवडलेला मॅस्कॉट महापालिकेच्या सर्व स्वच्छतेच्या उपक्रमांमध्ये शहराचे प्रतिनिधित्व करेल. हा मॅस्कॉट शहराच्या स्वच्छतेचा एक प्रभावी ब्रँड ॲम्बेसेडर म्हणून काम करेल, अशी अपेक्षा आहे.
स्पर्धेची नियमावली
स्पर्धेसाठी काही महत्त्वाच्या अटी आणि नियम निश्चित करण्यात आले आहेत:
- एका व्यक्तीला एकच डिझाइन पाठवता येईल.
- डिझाइन पूर्णतः स्वयंनिर्मित असावे.
- मॅस्कॉटमध्ये स्वच्छता, आरोग्य, जबाबदारी, नागरिक सहभाग, प्लास्टिकमुक्ती आणि कचरा विलगीकरण यांसारख्या संकल्पनांचा समावेश असावा.
- डिझाइन प्रेरणादायी आणि स्थानिक संस्कृतीशी सुसंगत असावे.
- परीक्षकांचा निर्णय अंतिम व बंधनकारक असेल.
सहभाग कसा घ्याल?
या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी नागरिकांनी महापालिकेने दिलेल्या https://forms.gle/K7L2hN6eS4V3LYto6 या लिंकवर क्लिक करून अर्ज भरायचा आहे. अर्जामध्ये आपले नाव, पत्ता, ई-मेल, मोबाईल क्रमांक नमूद करून डिझाइन अपलोड करावे. तसेच, डिझाइन मागील संकल्पना थोडक्यात लिहून अर्ज सादर करावा.
या स्पर्धेला मिळालेला प्रतिसाद पाहून अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे म्हणाले, “मॅस्कॉट डिझाइन ही केवळ एक स्पर्धा नसून, शहराच्या स्वच्छतेमध्ये लोकसहभाग वाढवण्याचे प्रभावी माध्यम आहे.” तर उपायुक्त सचिन पवार यांनी सांगितले की, “स्वच्छतेच्या वाटचालीत नागरिकांचा सक्रिय सहभाग अत्यंत आवश्यक असून, ही स्पर्धा नागरिकांना आपल्या कल्पकतेद्वारे शहरासाठी योगदान देण्याची अनोखी संधी आहे.”
© 2025 मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.
