वाशिम स्त्री रुग्णालयात निष्काळजीपणाचा आरोप: सिझेरियननंतर महिलेच्या मृत्यू प्रकरणी मोठी कारवाई!
एक परिचारिका निलंबित, चार कंत्राटी कर्मचाऱ्यांची सेवा समाप्त; चार डॉक्टरांना ‘कारणे दाखवा’ नोटीस
२१ ऑगस्ट २०२५, मॅक्स मंथन डेली न्यूज:
वाशिम, प्रतिनिधी : विलास सावळे :वाशिम येथील शासकीय स्त्री रुग्णालयातील डॉक्टरांच्या कथित हलगर्जीपणामुळे सिझेरियननंतर श्वेता अजय पडघाने (वय २४) या महिलेचा मृत्यू झाल्याची घटना घडली. याच रुग्णालयात याआधीही एका बाळाचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची बातमी समोर आल्याने संतप्त प्रतिक्रिया उमटल्या होत्या. ही गंभीर बाब लक्षात घेता, राज्याचे आरोग्यमंत्री प्रकाश आंबीटकर यांनी तात्काळ चौकशीचे आदेश दिले.
आरोग्य उपसंचालक, परिमंडळ अकोला, कमलेश भंडारी यांच्या नेतृत्वाखाली एक चौकशी समिती स्थापन करण्यात आली होती. या समितीने केलेल्या चौकशीचा अहवाल १८ ऑगस्ट रोजी प्राप्त झाला. या अहवालाच्या आधारे आरोग्य विभागाने कठोर पाऊले उचलली आहेत.

कारवाईचा बडगा आणि रुग्णालयात खळबळ
चौकशी अहवालात दोषी आढळलेल्या परिचारिका स्वाती लोखंडे यांना निलंबित करण्यात आले आहे. तसेच, कर्तव्यात कसूर केल्याबद्दल चार कंत्राटी परिचारिकांची सेवा तत्काळ समाप्त करण्याचे आदेश काढण्यात आले आहेत. यामध्ये नंदा दानी राऊत, प्रगती वानखडे, रुपेश पांगरकर आणि सचिन गिलवटकर या कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.
या गंभीर प्रकरणात निष्काळजीपणा केल्याचा ठपका ठेवत कर्तव्यदक्ष आरोग्य उपसंचालक यांनी डॉ. आशिष ताले, डॉ. मोहन शेवाळकर, डॉ. ओम प्रकाश थोरात आणि डॉ. ज्ञानेश्वर बोंडे या चार डॉक्टरांना ‘कारणे दाखवा नोटीस’ बजावली आहे. या कारवाईमुळे वाशिम स्त्री रुग्णालयातील आरोग्य कर्मचाऱ्यांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.

एकीकडे शासन ‘माता सुरक्षित तर राष्ट्र सुरक्षित’ अशी घोषणा देत असताना, डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे बाल आणि माता मृत्यूच्या घटना घडत असतील, तर या घोषणेचा उद्देश सफल होत नाही, अशी चर्चा सामान्य नागरिकांमध्ये सुरू आहे. या प्रकरणी दोषींवर कारवाई झाल्यामुळे मृत महिलेच्या कुटुंबाला काही प्रमाणात न्याय मिळाल्याचे बोलले जात आहे.
© 2025 मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.
