news
Home अकोला ‘सातबारा कोरा’ करण्याचे आश्वासन हवेत विरले, शेतकऱ्याने जीवन संपवले!

‘सातबारा कोरा’ करण्याचे आश्वासन हवेत विरले, शेतकऱ्याने जीवन संपवले!

पावसामुळे पिकं गेली, कर्जाचा डोंगर वाढला; अकोल्यातील दुर्दैवी घटनेमुळे शासनावर संताप. (© २०२५ मॅक्स मंथन डेली न्यूज)

by maxmanthannews@gmail.com
Spread the love

कर्जबाजारीपणाला कंटाळून शेतकऱ्याची आत्महत्या; अकोल्यातील खरब ढोरे गावात दुर्दैवी घटना

 

 

पावसामुळे पिकांचे नुकसान, शासनाच्या आश्वासनांवर विश्वासघात झाल्याची भावना

 

अकोला, प्रतिनिधी : विलास सावळे – कर्जबाजारीपणा आणि सततच्या नैसर्गिक संकटांमुळे हतबल झालेल्या शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचे सत्र थांबण्याचे नाव घेत नाही. अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर तालुक्यातील खरब ढोरे गावातून अशीच एक दुर्दैवी घटना समोर आली आहे. येथे राजेंद्र ज्ञानदेवराव ढोरे (वय ४०) या शेतकऱ्याने आपल्या शेतात गळफास घेऊन जीवनयात्रा संपवली.


 

नैसर्गिक संकट आणि कर्जाचा डोंगर

 

ढगांच्या सदृश्य पावसामुळे राजेंद्र ढोरे यांच्या शेतामधून वाहणाऱ्या खोराड नदीच्या पुरामुळे त्यांचे सोयाबीन आणि कपाशीचे पीक मोठ्या प्रमाणात वाहून गेले. पिकांच्या नुकसानीमुळे त्यांच्यावर असलेले कर्जाचे डोंगर अधिकच वाढले. भारतीय स्टेट बँकेचे एक लाख रुपये आणि शिंधु पतसंस्थेचे साठ हजार रुपये असे एकूण १ लाख ६० हजार रुपयांचे कर्ज त्यांच्या नावावर होते. याच आर्थिक विवंचनेतून त्यांनी सकाळी आठ वाजता आपल्या शेतातील झाडाला गळफास लावून आत्महत्या केली.


 

‘सातबारा कोरा’ करण्याचे आश्वासन हवेत विरले?

 

शेतकऱ्यांच्या या दुर्दैवी घटनेमुळे शासनाबद्दल नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. निवडणुकीच्या वेळी ‘शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करू’ असे आश्वासन देऊन भाजपने मते मिळवली होती, असा आरोप नागरिक करत आहेत. तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मूर्तिजापूर येथील प्रचार सभेत हे आश्वासन दिले होते, मात्र ते पाळले गेले नसल्याची भावना व्यक्त होत आहे.

सरकारने शेतकऱ्यांचा विश्वासघात केला असून, या आत्महत्या थांबवण्यासाठी तातडीने कर्जमाफी जाहीर करावी, अशी जोरदार मागणी सर्वसामान्य नागरिक करत आहेत.


© 2025 मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!