news
Home पिंपरी चिंचवड ‘बाप्पा’च्या स्वागतासाठी प्रशासन सज्ज! पहाटेपासून आयुक्त शेखर सिंह मैदानात

‘बाप्पा’च्या स्वागतासाठी प्रशासन सज्ज! पहाटेपासून आयुक्त शेखर सिंह मैदानात

विसर्जन घाटांवर सुरक्षा, स्वच्छता आणि सोयीसुविधांचे निर्देश; मूर्तींच्या नोंदी ठेवण्याचा नवा नियम. (© २०२५ मॅक्स मंथन डेली न्यूज)

by maxmanthannews@gmail.com
Spread the love

अजित पवार यांच्या पावलावर पाऊल… आयुक्त शेखर सिंह यांनी केली पहाटे विसर्जन घाटांची पाहणी

 

 

गणेशोत्सवासाठी आवश्यक सोयीसुविधा व सुरक्षा व्यवस्था ठेवण्याचे अधिकाऱ्यांना निर्देश

 

२६ ऑगस्ट २०२५, मॅक्स मंथन डेली न्यूज:

पिंपरी, प्रतिनिधी शाम सोनवणे – गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पिंपरी-चिंचवड महापालिकेचे आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी आज सकाळी लवकरच शहरातील गणेश विसर्जन घाटांची पाहणी केली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कार्यशैलीचे अनुकरण करत आयुक्तांनी पहाटे ७ वाजता पाहणी दौऱ्याला सुरुवात केली. यावेळी त्यांनी गणेश भक्तांची गैरसोय होऊ नये, यासाठी सर्व आवश्यक सुविधा व सुरक्षा व्यवस्था पुरविण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना दिले.


मोशीसह प्रमुख घाटांचा दौरा

 

या दौऱ्याची सुरुवात मोशी येथील खाण परिसरातील विसर्जन घाटापासून झाली. येथे येणाऱ्या रस्त्यांची डागडुजी करून मुरुम टाकण्याची सूचना आयुक्तांनी दिली. तसेच, शहरातील आठही प्रभागांमधून येणाऱ्या मूर्तींच्या विसर्जनासाठी पुरेसे कर्मचारी, आरोग्य पथके आणि सुरक्षा रक्षक तैनात ठेवावेत, असेही त्यांनी सांगितले. सीसीटीव्ही, पुरेसे दिवे, मंडप आणि पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्याचे निर्देशही देण्यात आले.

मोशी खाणीनंतर आयुक्त सिंह यांनी मोशी येथील इंद्रायणी नदीवरील घाट, पिंपरीतील पवना नदीवरील झुलेलाल घाट आणि सांगवी येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर घाट अशा प्रमुख विसर्जन घाटांची पाहणी केली.


गणेशोत्सव नियोजनासाठी महत्त्वाच्या सूचना

 

आयुक्त शेखर सिंह यांनी यावेळी अधिकाऱ्यांना अनेक महत्त्वपूर्ण सूचना दिल्या, त्या खालीलप्रमाणे:

  • सुरक्षा व्यवस्था: गर्दीचे नियंत्रण करण्यासाठी उपाययोजना करा. जीवनरक्षक, अग्निशमन दलाचे जवान आणि आपत्तिमित्र यांची नियुक्ती करा.
  • स्वच्छता व सुविधा: निर्माल्यकुंड, कृत्रिम विसर्जन हौद यांची स्वच्छता आणि सुशोभीकरण करा. विसर्जन घाटांकडे येणाऱ्या रस्त्यांची डागडुजी करा.
  • इतर व्यवस्था: दिशादर्शक फलक लावा, पुरेसे कर्मचारी व यंत्रणा कार्यान्वित ठेवा आणि आपत्कालीन व्यवस्थापनाची यंत्रणा सक्षम करा.

यासोबतच, विसर्जनासाठी आलेल्या मूर्तींची नोंद ठेवण्याचेही निर्देश आयुक्तांनी दिले. मूर्ती पीओपीची आहे की शाडू मातीची आणि तिची उंची पाच फूट किंवा त्यापेक्षा जास्त आहे का, याची नोंद ठेवणे बंधनकारक असेल असे त्यांनी स्पष्ट केले.


© 2025 मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!