news
Home पिंपरी चिंचवड दगडशेठच्या मंडपात ‘महाराष्ट्र’ आणि ‘केरळ’चा सांस्कृतिक संगम!

दगडशेठच्या मंडपात ‘महाराष्ट्र’ आणि ‘केरळ’चा सांस्कृतिक संगम!

'चेन्ड्रा मेलम'च्या तालावर यंदाचा गणेशोत्सव होणार अविस्मरणीय; विसर्जन मिरवणुकीत ६० वादकांचा भव्य गट सहभागी. (© २०२५ मॅक्स मंथन डेली न्यूज)

by maxmanthannews@gmail.com
Spread the love

केरळच्या पारंपरिक संगीताचा नाद दगडूशेठच्या गणेशोत्सवात!

 

 

श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टच्या मंडपात अनुभवा ‘चेन्ड्रा मेलम’; पद्मनाभस्वामी मंदिराच्या प्रतिकृतीतून दक्षिण भारतीय संस्कृतीचा जागर

 

२८ ऑगस्ट २०२५, मॅक्स मंथन डेली न्यूज:

पुणे – केरळमधील मंदिरांच्या उत्सवाचा आत्मा मानले जाणारे ‘चेन्ड्रा मेलम’ हे पारंपरिक संगीत आता पुण्यातही अनुभवायला मिळणार आहे. यंदाच्या १३३ व्या गणेशोत्सवासाठी श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टने तिरुवनंतपुरम येथील पद्मनाभस्वामी मंदिराची भव्य प्रतिकृती साकारली असून, या निमित्ताने केरळच्या पारंपरिक संगीत कलेचा जागर होणार आहे.


 

रोज पहाटे ‘चेन्ड्रा मेलम’चा ताल

 

चेन्ड्रा मेलम हे अनेक ‘चेन्डा’ (एक प्रकारचा दंडगोलाकार ढोल), इलाथलम (झांजा), कोंबू (शंख) आणि कुझल (एक वाद्य) यांसारख्या वाद्यांनी तयार झालेले एक भव्य वाद्यवृंद आहे. या वाद्यांचा नाद सकाळी ५:३० ते ६:३० या वेळेत २९ ऑगस्ट ते ६ सप्टेंबरपर्यंत दगडूशेठच्या मंडपात घुमणार आहे. सुरेश नायर यांच्या नेतृत्वाखालील ‘नादब्रम्ह कलावेदी’ हा समूह हा कार्यक्रम सादर करणार आहे.

सुरेश नायर यांनी दिलेल्या माहितीनुसार, दररोज सकाळी १५ ते २५ वादकांचा समूह आपली कला सादर करेल, तर ६ सप्टेंबर रोजी विसर्जन मिरवणुकीत तब्बल ६० वादकांचा एक भव्य गट सहभागी होणार आहे. त्यासाठी केरळमधून खास कलाकारांना पुण्यात आणले जात आहे.


 

केरळच्या संस्कृतीची ओळख

 

श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टचे खजिनदार महेश सूर्यवंशी म्हणाले, “यंदा आम्ही पद्मनाभस्वामी मंदिराची प्रतिकृती साकारली आहे, त्यामुळे केरळमधील पारंपरिक वाद्यांची ओळख पुणेकरांना करून द्यायची होती. यामुळे नागरिकांना केरळच्या समृद्ध सांस्कृतिक परंपरेची अनुभूती घेता येईल.”

‘नादब्रम्ह कलावेदी’ या समूहाने यापूर्वी २०१९ मध्ये पहिल्यांदा दगडूशेठच्या गणेशोत्सवात सादरीकरण केले होते. यावेळी, ६० कलाकारांचा मोठा समूह विसर्जन मिरवणुकीत सहभागी होणार असल्याने, हा सोहळा पुण्यातील गणेश भक्तांसाठी एक अविस्मरणीय अनुभव ठरेल, अशी अपेक्षा आहे.


© 2025 मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!