‘शिक्षणाने मिळते आयुष्याला आकार’ – प्राजक्ता निरगुडकर
पिंपरी चिंचवड विद्यापीठात अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांचे ‘दीक्षारंभ’ कार्यक्रमात स्वागत
२९ ऑगस्ट २०२५, मॅक्स मंथन डेली न्यूज:
पिंपरी, प्रतिनिधी शाम सोनवणे – पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्ट (PCET) संचालित पिंपरी चिंचवड विद्यापीठात (PCU) नवीन शैक्षणिक वर्षाची सुरुवात ‘दीक्षारंभ’ समारंभाने झाली. यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना मास्टरकार्ड पुणे सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग विभागाच्या संचालिका प्राजक्ता निरगुडकर यांनी सांगितले की, “शिक्षणाने व्यक्तीच्या आयुष्याला आकार मिळतो.” अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण झाल्यावर विद्यार्थ्यांनी आपल्या ज्ञानाचा उपयोग समाजाच्या गरजा आणि प्रश्न सोडवण्यासाठी करावा, असे आवाहनही त्यांनी केले.

ज्ञानाच्या कक्षा रुंदवा
निरगुडकर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की, शैक्षणिक काळात त्यांनी फक्त पुस्तकी ज्ञान न घेता, वेगवेगळ्या क्षेत्रातील व्यक्तींशी संवाद साधावा आणि विविध प्रकल्पांना भेटी देऊन आपल्या ज्ञानाच्या कक्षा रुंदवाव्यात.

या कार्यक्रमाला मुंबई कस्टम विभागाचे आयुक्त गिरीधर पै, पीसीयूचे प्र-कुलगुरू डॉ. सुदीप थेपडे, स्कूल ऑफ इंजिनीअरिंग अँड टेक्नॉलॉजीचे विभाग प्रमुख डॉ. रामदास बिरादार, आणि अभियांत्रिकी विभाग अधिष्ठाता डॉ. विजय पाटील उपस्थित होते.
गिरीधर पै यांनी विद्यार्थ्यांना सांगितले की, “तुम्ही अल्पावधीतच नावलौकिक प्राप्त केलेल्या पिंपरी चिंचवड विद्यापीठात प्रवेश घेतला आहे. पुढील चार वर्षांत विद्यार्थ्यांनी स्वतःला सिद्ध करून नवीन कौशल्ये आत्मसात करावीत, म्हणजे तुम्ही भविष्यातील आव्हानांना सामोरे जाऊन यशस्वी व्हाल.”

डॉ. सुदीप थेपडे, डॉ. रामदास बिरादार यांनीही विद्यार्थी, पालकांना मार्गदर्शन केले. सूत्रसंचालन रितू दुधमल आणि शितल विसपूते यांनी आभार मानले. कार्यक्रमास विविध विद्या शाखेचे अधिष्ठाता, प्राध्यापक, विद्यार्थी, पालक उपस्थित होते.
पीसीईटीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्षा पद्माताई भोसले, सचिव विठ्ठल काळभोर, खजिनदार शांताराम गराडे, विश्वस्त तथा पीसीयुचे कुलपती हर्षवर्धन पाटील, उद्योजक नरेंद्र लांडगे, अजिंक्य काळभोर, कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
© 2025 मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.
