गणपती विसर्जनासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेची जय्यत तयारी
अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील यांच्याकडून मोशी खाण विसर्जन स्थळाची पाहणी
पिंपरी, प्रतिनिधी शाम सोनवणे ०२ सप्टेंबर २०२५:
पिंपरी चिंचवड शहरात गणेशोत्सवाचा उत्साह शिगेला पोहोचला असताना, महानगरपालिकेने गणेश विसर्जन सोहळ्याची तयारी सुरू केली आहे. महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील यांनी मोशी खाण येथील मुख्य विसर्जन स्थळाला भेट देऊन पाहणी केली. गणेश विसर्जन सोहळा सुरळीत आणि सुरक्षित पार पडावा, यासाठी सर्व आवश्यक सुविधा उपलब्ध करण्याचे निर्देश त्यांनी यावेळी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.

तयारीचा आढावा आणि उपस्थित अधिकारी
मोशी खाण येथे झालेल्या बैठकीत अतिरिक्त आयुक्तांनी विविध विभागांच्या अधिकाऱ्यांकडून तयारीचा सविस्तर आढावा घेतला. या वेळी वाहतूक व्यवस्था, मनुष्यबळ, क्रेन, सुरक्षा व्यवस्था, स्वच्छता, पाणीपुरवठा, वीजपुरवठा आणि कचरा व्यवस्थापन यांसारख्या महत्त्वाच्या बाबींवर चर्चा करण्यात आली. या पाहणी दौऱ्यावेळी महापालिकेचे सह शहर अभियंता अनिल भालसाखळे, उपायुक्त अण्णा बोदडे आणि सचिन पवार ,निलेश भदाणे,संदीप खोत, सिताराम बहुरे,मुख्य सुरक्षा अधिकारी उदय जरांडे, मुख्य आपत्ती व्यवस्थापन अधिकारी ओमप्रकाश बहिवाल, क्षेत्रीय अधिकारी निवेदीता घार्गे,अश्विनी गायकवाड,तानाजी नरळे,किशोर ननावरे,,पूजा दूधनाळे,सहाय्यक आयुक्त उमेश ढाकणे, विशेष अधिकारी किरण गायकवाड, जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक तसेच कार्यकारी अभियंता विजय भोजने,वैशाली ननावरे,चंद्रकांत मुठाळ,सुनिलदत्त नरोटे,सतीश वाघमारे,हेमंत देसाई,विजय जाधव, सहाय्यक आरोग्याधिकारी,आरोग्य निरीक्षक यांच्यासह महापालिकेच्या विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

संपूर्ण शहरासाठी नियोजन
मोशी खाण हे शहरातील मूर्ती विसर्जनाचे मुख्य ठिकाण असले, तरी महापालिका शहराच्या इतरही विसर्जन स्थळांवर सुविधा उपलब्ध करून देत आहे. प्रत्येक ठिकाणी प्रकाशयोजना, पिण्याचे पाणी, वैद्यकीय सुविधा, सुरक्षा व्यवस्था, वाहतूक नियोजन आणि आपत्कालीन परिस्थिती हाताळण्यासाठी विशेष कृती दलाची नेमणूक करण्यात आली आहे.

अतिरिक्त आयुक्तांचे आवाहन
यावेळी बोलताना अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील म्हणाले, “गणेशोत्सव हा शहरातील सांस्कृतिक आणि सामाजिक जीवनाचा अविभाज्य भाग आहे. विसर्जन काळात नागरिकांची सुरक्षितता आणि आदर्श विसर्जन व्यवस्था ही महापालिकेची सर्वोच्च प्राथमिकता आहे. त्यानुसार सर्व विभागांनी एकत्रितपणे समन्वय साधून कार्य करणे आवश्यक आहे. नागरिकांनीही प्रशासनाला सहकार्य करून पर्यावरणपूरक पद्धतीने मूर्तीचे विसर्जन करावे.”
अतिरिक्त आयुक्तांच्या निर्देशानुसार, सर्व संबंधित विभागांनी तातडीने कार्यवाही सुरू केली असून, गणेश विसर्जन काळात शहरवासीयांना सुरळीत, सुरक्षित आणि पर्यावरणपूरक सेवा देण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
© 2025 मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.
