news
Home पिंपरी चिंचवड महापालिका शाळांच्या खेळाडूंची ऐतिहासिक ‘ट्राय’! शहराच्या शिरपेचात मानाचा तुरा

महापालिका शाळांच्या खेळाडूंची ऐतिहासिक ‘ट्राय’! शहराच्या शिरपेचात मानाचा तुरा

रग्बीमध्ये राज्यस्तरीय रौप्यपदक, स्क्वॅशमध्येही चमकदार कामगिरी; विद्यार्थ्यांच्या यशाचे सर्वत्र कौतुक. (© २०२५ मॅक्स मंथन डेली न्यूज)

by maxmanthannews@gmail.com
Spread the love

क्रीडा क्षेत्रात महापालिका शाळांची ऐतिहासिक कामगिरी

 

 

रग्बीमध्ये राज्यस्तरीय रौप्यपदक तर स्क्वॅशमध्ये विभागीय स्पर्धेसाठी निवड; विद्यार्थ्यांचे दुहेरी यश

 

पिंपरी,प्रतिनिधी शाम सोनवणे    ०२ सप्टेंबर २०२५:

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या शाळांनी आता ज्ञानासोबतच क्रीडा संस्कृतीतही आपली छाप पाडण्यास सुरुवात केली आहे. नुकत्याच झालेल्या राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेत महापालिकेच्या विद्यार्थ्यांनी रग्बी आणि स्क्वॅश या खेळांमध्ये चमकदार कामगिरी करत शहरासाठी ऐतिहासिक यश संपादन केले आहे.


 

रग्बीमध्ये ऐतिहासिक रौप्यपदक

 

शिवछत्रपती क्रीडा संकुल, बालेवाडी, पुणे येथे झालेल्या राज्यस्तरीय रग्बी स्पर्धेत कै. दत्तोबा रामचंद्र काळे इंग्लिश मीडियम स्कूल, काळेवाडी येथील विद्यार्थी दया जाधव, अबुजर अन्सारी आणि सुमित गायकवाड यांनी पुणे जिल्हा संघाचे प्रतिनिधित्व केले. या संघाने एकूण सात सामने जिंकून अंतिम फेरीत प्रवेश केला. बीड संघाविरुद्धच्या अंतिम सामन्यात १-२ अशा फरकाने उपविजेतेपद पटकावत त्यांनी रौप्यपदकाची कमाई केली. विशेष म्हणजे, पुणे संघासाठी एकमेव ‘ट्राय’ दया जाधवने नोंदवला. महापालिकेच्या शाळांमधून राज्यस्तरीय स्पर्धेत प्रथमच मिळालेले हे रौप्यपदक विद्यार्थ्यांच्या परिश्रमाचे आणि शहरासाठीच्या अभिमानाचे प्रतीक ठरले आहे.


स्क्वॅशमध्येही चमकदार कामगिरी

 

याच स्पर्धेत श्रीमती अनुसयाबाई नामदेव वाघेरे इंग्लिश मीडियम स्कूल, पिंपरी येथील विद्यार्थ्यांनी स्क्वॅश या नव्याने समाविष्ट झालेल्या खेळात दमदार कामगिरी केली. सूरज मदने याने १४ वर्षाखालील गटात द्वितीय क्रमांक पटकावत रौप्यपदकासह विभागीय स्पर्धेसाठी पात्रता मिळवली. तर, प्रथमेश कुंभार याने १७ वर्षाखालील गटात चौथा क्रमांक मिळवून विभागीय स्पर्धेतील आपले स्थान निश्चित केले. त्यांच्या या यशामागे प्रशिक्षक सुशील सरांचे मार्गदर्शन मोलाचे ठरले.


 

प्रशासनाकडून कौतुकाचा वर्षाव

 

विद्यार्थ्यांच्या या कामगिरीबद्दल महापालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्यांचे कौतुक केले आहे.

आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह म्हणाले, “विद्यार्थ्यांची चिकाटी, परिश्रम आणि खिलाडूवृत्ती या यशामागे स्पष्टपणे दिसून येते. असे उपक्रम विद्यार्थ्यांना नेतृत्व, संघभावना आणि आत्मविश्वास शिकवतात. यामुळे शाळा केवळ ज्ञानाचे केंद्र न राहता व्यक्तिमत्त्व घडविण्याचे व्यासपीठ ठरते.”

अतिरिक्त आयुक्त (१) प्रदीप जांभळे पाटील यांनीही या यशाबद्दल आनंद व्यक्त केला. ते म्हणाले, “ही कामगिरी आपल्या सर्वांसाठी अभिमानाची बाब आहे. शालेय शिक्षणासोबतच खेळांच्या माध्यमातून सर्वांगीण विकासाला नवे बळ मिळत आहे.”

सहाय्यक आयुक्त किरणकुमार मोरे यांनी शिक्षण विभागाचा सर्वांगीण विकासाचा उद्देश प्रत्यक्षात उतरत असल्याचे म्हटले. “हेच विद्यार्थी उद्याच्या स्पर्धात्मक जगात शहराचे प्रतिनिधित्व करतील,” असेही त्यांनी नमूद केले.

महापालिका शाळांतील विद्यार्थ्यांच्या या यशाने शहरातील क्रीडा संस्कृतीला नवी दिशा मिळाली आहे.


© 2025 मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!