मानवतेची दिवाळी! ‘ज्ञान नर्मदा’ संस्थेचा पुढाकार, दिव्यांगांसोबत दिवाळी साजरी
मूर्तीजापूर येथील ‘हॅपी वुमन्स क्लब’कडून कुष्ठरोगी आणि गरीब बांधवांना दिवाळी फराळ, मिठाई व फटाक्यांचे वाटप
मूर्तीजापूर, प्रतिनिधी विलास सावळे, दि. २२ ऑक्टोबर २०२५, मॅक्स मंथन डेली न्यूज:
मूर्तीजापूर येथील ज्ञान नर्मदा बहुउद्देशीय संस्थेचे संस्थापक विष्णू लोडम यांच्या संकल्पनेतून साकार झालेल्या सामाजिक कार्यात अग्रेसर असलेल्या हॅपी वुमन्स क्लबच्या अध्यक्षा सुनिता लोडम यांच्या पुढाकाराने यंदा दिव्यांग बांधवांसोबत दिवाळी साजरी करण्यात आली. या उपक्रमाने संस्थेने मानवतेचा परिचय दिला आहे.
ज्ञान नर्मदा बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने वर्षभर विविध समाजोपयोगी उपक्रम आयोजित केले जातात, ज्यात राजमाता जिजाऊ जयंती उत्सव, जागतिक महिला दिन, वृक्षारोपण, आरोग्य शिबिर, स्वच्छता अभियान, विद्यार्थी गुणगौरव, रक्तदान शिबिर, ज्येष्ठ नागरिक सत्कार आणि होतकरू महिलांचा सत्कार यांचा समावेश असतो.


सिरसो गायरान येथील दिव्यांगांना आनंद
संस्थेच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यावर्षीसुद्धा दिवाळी सिरसो गायरान येथील कुष्ठरोगी, दिव्यांग आणि गरीब गरजू बांधवांना सोबत घेऊन साजरी करण्यात आली. यावेळी या बांधवांना दिवाळी फराळ, मिठाई, केक तसेच फुलझडी फटाक्यांचे वाटप करण्यात आले.
या कार्यक्रमाच्या आयोजनाने कुष्ठरोगी आणि दिव्यांग बांधवांनी तसेच लाडक्या बहिणी व भावांनी मोठा आनंद व्यक्त केला, त्यांच्या चेहऱ्यावर समाधान फुलले.












