पिंपरी-चिंचवडमध्ये अनधिकृत बांधकामे, नळ जोडण्या आणि अतिक्रमणांवर पालिकेचा हातोडा; आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांचा इशारा
पिंपरी चिंचवड प्रतिनिधी आकाश कांबळे, २८ एप्रिल २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:
पिंपरी: पिंपरी-चिंचवड शहरात स्वच्छता आणि शिस्त राखण्यासाठी महानगरपालिका प्रशासन आता अत्यंत कडक पावले उचलणार आहे. “शहरातील अनधिकृत जाहिराती, फूटपाथवरील अतिक्रमणे, बेकायदेशीर नळ जोडण्या आणि विनापरवाना सुरू असलेल्या बांधकामांवर तीव्र कारवाई करा,” असे स्पष्ट निर्देश आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी सर्व क्षेत्रीय अधिकाऱ्यांना दिले आहेत.
प्रशासकीय प्रमुख आणि क्षेत्रीय अधिकाऱ्यांसोबत घेतलेल्या आढावा बैठकीत आयुक्त बोलत होते. यावेळी त्यांनी स्पष्ट केले की, शहराचे सौंदर्य विद्रुप करणाऱ्यांवर आणि नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कोणतीही दयामाया दाखवली जाणार नाही.
नागरिकांना चालण्यासाठी सुरक्षित मार्ग मिळावा यासाठी महापालिकेने ‘अतिक्रमणमुक्त फूटपाथ’ मोहीम अधिक तीव्र करण्याचा निर्णय घेतला आहे. क्षेत्रीय स्तरावर यासाठी विशेष पथके कार्यरत राहतील. तसेच, शहरातील भिंती, विजेचे खांब आणि डीपी बॉक्सवर लावलेले अनधिकृत बॅनर तात्काळ हटवून, त्यावरील मोबाईल क्रमांकांच्या आधारे संबंधित व्यक्तींना नोटिसा बजावण्याचे आदेशही त्यांनी दिले आहेत.
शहरातील पाणीपुरवठा व्यवस्था सुरळीत ठेवण्यासाठी बेकायदेशीर नळ जोडण्यांवर थेट कारवाई केली जाणार आहे. पाणी चोरी करणाऱ्यांचे नळ कनेक्शन तोडण्याचे आदेश देण्यात आले असून, पाणी टंचाईच्या काळात असा गैरप्रकार खपवून घेतला जाणार नाही, असेही प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
अनधिकृत बांधकामांबाबत आयुक्तांनी नागरिकांना महत्त्वाचे आवाहन केले आहे. “ज्या बांधकामांना महापालिकेची अधिकृत परवानगी नाही, अशा ठिकाणच्या सदनिका किंवा घरे नागरिकांनी खरेदी करू नयेत. अशी अनधिकृत बांधकामे महापालिका निष्कासित (पाडणार) करणार आहे. त्यामुळे कष्टार्जित पैसा गुंतवताना बांधकामाची अधिकृतता तपासूनच निर्णय घ्यावा,” असे आवाहन डॉ. सूर्यवंशी यांनी केले आहे.
आगामी स्वच्छ सर्वेक्षणामध्ये पिंपरी-चिंचवड शहराला देशात अव्वल स्थान मिळवून देण्यासाठी कचरा संकलन, विलगीकरण आणि व्यवस्थापनावर विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. शहराला कचरामुक्त करण्यासाठी नागरिकांनीही प्रशासनाला सहकार्य करावे, असे यावेळी सांगण्यात आले.
या बैठकीला अतिरिक्त आयुक्त कुलदीप जंगम, तृप्ती सांडभोर, विक्रांत बगाडे, मुख्य अभियंता प्रमोद ओंभासे, जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक आणि सर्व क्षेत्रीय अधिकारी उपस्थित होते.
© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.






