शहरातील अनधिकृत जाहिरातींवर कारवाईची मागणी
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदीप गायकवाड यांनी मनपा उपायुक्तांना दिले निवेदन
पिंपरी, प्रतिनिधी शाम सोनवणे १८ सप्टेंबर २०२५, मॅक्स मंथन डेली न्यूज:
पिंपरी-चिंचवड शहरात मोठ्या प्रमाणावर लावण्यात आलेल्या अनधिकृत जाहिरात फलकांमुळे शहर विद्रूप होत असून, यावर तातडीने कारवाई करण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पिंपरी-चिंचवड शहर जिल्हा उपाध्यक्ष प्रदीप गायकवाड यांनी केली आहे. त्यांनी आकाश चिन्ह व परवाना विभागाचे उपायुक्त राजेश आगळे यांची भेट घेऊन या संदर्भात एक निवेदन दिले.
अनधिकृत जाहिरातींचा सुळसुळाट
गायकवाड यांनी निवेदनात म्हटले आहे की, शहरात ठिकठिकाणी अनधिकृत जाहिरात फलक आणि ‘क्युऑक्स’ फलक मोठ्या प्रमाणावर लावण्यात आले आहेत. यामुळे शहराचे विद्रूपीकरण होत असून, महापालिकेचा अतिक्रमण विभाग याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे. अशा जाहिरातदारांवर कोणतीही दंडात्मक कारवाई केली जात नाही, त्यामुळे महापालिकेचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे.
महामेट्रोच्या जाहिरातींवर आक्षेप
महामेट्रोने पिंपरी ते बोपोडीपर्यंत मेट्रोच्या पिलरवर लावलेल्या अवाढव्य विजेच्या जाहिरात फलकांवरही गायकवाड यांनी आक्षेप घेतला. हे फलक वाहनचालकांचे लक्ष विचलित करत असल्याने गंभीर अपघात होण्याची शक्यता आहे, असे त्यांनी निवेदनात म्हटले आहे. यावर तातडीने कारवाई करून महामेट्रोचे व्यवस्थापक श्रावण हर्डीकर यांना नोटीस बजावण्याची मागणीही त्यांनी केली.
व्यवसाय परवान्यांचा महसूल बुडत असल्याचा आरोप
याव्यतिरिक्त, शहरात अनेक दुकाने आणि व्यावसायिक व्यवसाय परवाना काढण्यासाठी टाळाटाळ करत असल्यामुळे महापालिकेचा कोट्यवधी रुपयांचा महसूल बुडत आहे. यावर तातडीने कारवाई करून महसूल वाढवण्याची मागणीही गायकवाड यांनी केली.
उपायुक्त राजेश आगळे यांनी निवेदनाची दखल घेऊन सर्व तक्रारींवर तातडीने कारवाई करण्याचे आश्वासन दिले असल्याचे प्रदीप गायकवाड यांनी सांगितले.
© 2025 मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.
