news
Home पिंपरी चिंचवड स्वच्छ भारत अभियानात PCMC चा ‘मास्टर प्लॅन’! पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेने घेतला ५ नगरपरिषदांना मार्गदर्शन करण्याचा पुढाकार

स्वच्छ भारत अभियानात PCMC चा ‘मास्टर प्लॅन’! पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेने घेतला ५ नगरपरिषदांना मार्गदर्शन करण्याचा पुढाकार

आयुक्त शेखर सिंह यांच्या उपस्थितीत सामंजस्य करार संपन्न; कचरा विलगीकरण, संकलन व प्रक्रिया या यशस्वी पद्धतींचा लाभ इतर शहरांना मिळणार. (© २०२५ मॅक्स मंथन डेली न्यूज )

by maxmanthannews@gmail.com
Spread the love

 

 देशासाठी आदर्श! पिंपरी-चिंचवड महापालिका ‘स्वच्छ शहर जोडी’ उपक्रमात मार्गदर्शक

 


 

उत्कृष्ट कामगिरीबद्दल निवड; पुणे, नाशिक, भंडारा आणि अहिल्यानगर (अहमदनगर) जिल्ह्यातील नगरपरिषदांना स्वच्छतेचे धडे देणार.

 

पिंपरी चिंचवड, प्रतिनिधी बालाजी नवले, सप्टेंबर , मॅक्स मंथन डेली न्यूज:

भारत सरकारच्या गृहनिर्माण व शहरी कार्य मंत्रालयाच्या महत्त्वाकांक्षी “स्वच्छ शहर जोडी (SSJ) उपक्रमात” पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेची निवड देशातील सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या मार्गदर्शक शहरांमध्ये झाली आहे. या महत्त्वाच्या निवडीमुळे पिंपरी-चिंचवड महापालिका आता स्वच्छ भारत अभियानाच्या पुढील टप्प्यात लहान शहरांसाठी आदर्श मॉडेल म्हणून काम पाहणार आहे.

शहरांना मार्गदर्शन करण्याची जबाबदारी

 

उत्कृष्ट कामगिरी केलेल्या शहरांना, कमी कामगिरी करणाऱ्या नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांना मार्गदर्शन करण्याची जबाबदारी ‘स्वच्छ शहर जोडी’ उपक्रमांतर्गत दिली जाते. त्यानुसार, पिंपरी-चिंचवड महापालिका आता पुढील नगरपरिषद आणि नगरपंचायतींना घनकचरा व्यवस्थापन, कचरा विलगीकरण, संकलन व प्रक्रिया या प्रणालींमध्ये मार्गदर्शन करेल:

१. सुरगाणा नगरपंचायत (जि. नाशिक)

२. लांखादूर नगरपंचायत (जि. भंडारा)

३. मंचर नगरपंचायत (जि. पुणे)

४. जामखेड नगरपरिषद (जि. अहिल्यानगर)

५. आळंदी नगरपरिषद (जि. पुणे)

सामंजस्य करार संपन्न

 

या मार्गदर्शनासंदर्भातील सामंजस्य कराराचा कार्यक्रम ऑटो क्लस्टर, पिंपरी येथे पार पडला. केंद्रीय मंत्री मा. मोहनलाल खट्टर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या व्हिडिओ कॉन्फरन्स बैठकीत हा करार झाला. यावेळी पिंपरी-चिंचवड महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी करारावर स्वाक्षरी केली.

यावेळी आयुक्त शेखर सिंह यांनी सांगितले, “पिंपरी-चिंचवड महानगरपालिका या सर्व नगरपरिषदांना स्वच्छता क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी साध्य करण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करेल. घनकचरा व्यवस्थापनातील आमचा अनुभव, तंत्रज्ञान व व्यवस्थापन पद्धतींचा लाभ या संस्थांना दिला जाईल.”

आरोग्य विभाग प्रमुख व उप आयुक्त सचिन पवार यांनी देखील महापालिकेच्या यशस्वी प्रकल्पांची माहिती दिली आणि सांगितले की, या नगरपरिषदांच्या कामगिरीत सातत्याने वाढ होण्यासाठी आवश्यक ते सर्व सहकार्य वेळोवेळी केले जाईल.

यावेळी अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे, आरोग्य विभाग प्रमुख सचिन पवार यांच्यासह संबंधित नगरपरिषदांचे मुख्याधिकारी महादेव खांडेकर (आळंदी), अजय साळवे (जामखेड), गोविंद जाधव (मंचर), सचिन कुमार पटेल (सुरगाणा) उपस्थित होते. पिंपरी-चिंचवड महापालिकेचा हा पुढाकार स्वच्छतेच्या दिशेने एकात्मिक आणि सामूहिक प्रगतीसाठी महत्त्वाचा ठरणार आहे.


© मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!