सायबर गुन्हेगारीला ‘व्हर्च्युअल’ उत्तर! – ४५ हजार नागरिकांशी थेट संवाद साधून जनजागृती
पोलिस आयुक्त विनयकुमार चौबे यांच्या संकल्पनेतून ‘व्हर्च्युअल टाऊन हॉल’मध्ये (ट्विटर) माध्यमाचा प्रभावी वापर
पिंपरी-चिंचवड, प्रतिनिधी शाम सोनवणे, १५ ऑक्टोबर २०२५, मॅक्स मंथन डेली न्यूज:
मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांनी ऑक्टोबर २०२५ हा महिना ‘सायबर सुरक्षा जनजागृती महिना’ म्हणून घोषित केला आहे. या अनुषंगाने पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयाच्या वतीने नागरिकांना विविध पोलिस सेवा सहज उपलब्ध व्हाव्यात आणि गुन्ह्यांना प्रतिबंध करता यावा, या उद्देशाने सातत्याने अभिनव उपक्रम राबवले जात आहेत. याचाच एक भाग म्हणून, पोलिस आयुक्त श्री. विनयकुमार चौबे यांच्या संकल्पनेतून ‘X’ (ट्विटर) या माध्यमाचा प्रभावी उपयोग करून ‘व्हर्च्युअल टाऊन हॉल’ या अभिनव संकल्पनेद्वारे सर्व स्तरांतील नागरिकांशी थेट संवाद साधण्यात आला.

हजार नागरिकांचा सहभाग
दिनांक १४ ऑक्टोबर २०२५ रोजी सकाळी ११ ते १३ या वेळेत झालेल्या या कार्यक्रमात:
- पोलिस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रातील ८१ ठिकाणांवरील शाळा, कॉलेज आणि औद्योगिक समूहांमधील १२ हजारहून अधिक विद्यार्थी व नागरिकांनी प्रत्यक्ष सहभाग घेतला.
- सुमारे ३३ नागरिकांनी ऑनलाईन हजेरी लावली.
- एकूण ४५ हजारपेक्षा जास्त नागरिकांनी या उपक्रमात प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष सहभाग घेतला.

सायबर सुरक्षा आणि गुन्हेगारीवर थेट मार्गदर्शन
मा. पोलिस आयुक्तांनी यावेळी नामनिर्देशित ठिकाणी हजर असलेल्या विद्यार्थी व नागरिकांना सायबर गुन्हे आणि सुरक्षेबाबत ऑनलाईन मार्गदर्शन करून जनजागृती केली. नागरिकांना @PCcityPolice आणि @CP-PccityPolice या अधिकृत हँडलवर आपले प्रश्न, सूचना आणि तक्रारी मेसेज करण्याचं आवाहन करण्यात आले.
नागरिकांनी यावेळी विविध प्रकारच्या सायबर फ्रॉड आणि गुन्ह्यांसंबंधी तसेच त्यांना प्रतिबंध करण्यासाठी कोणत्या उपाययोजना केल्या पाहिजेत, याबाबत प्रश्न उपस्थित केले. मा. पोलिस आयुक्त श्री. विनयकुमार चौबे यांनी या सर्व प्रश्नांची समर्पक आणि सविस्तर उत्तरे देऊन व्यापक जनजागृती केली.

या ‘टाऊन हॉल’साठी मा. पोलिस आयुक्त श्री. विनयकुमार चौबे यांच्यासह मा. पोलिस सह आयुक्त डॉ. शशिकांत महावरकर, मा. अपर पोलिस आयुक्त श्री. सारंग आवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व पोलिस उप-आयुक्त, सर्व सहा. पोलिस आयुक्त तसेच सर्व पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक यांनी सहभाग घेतला होता.
हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी सहा. पोलिस आयुक्त (गुन्हे-) श्री. विशाल हिरे यांनी नियोजन केले. या कार्यक्रमाला नागरिकांचा खूप चांगला प्रतिसाद लाभला, ज्यामुळे भविष्यात सायबर गुन्ह्यांना प्रतिबंध होण्यासाठी नक्कीच हातभार लागणार आहे.
© मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.
