69
दिवाळीत शहराचीही स्वच्छता राखा! – PCMC चे नागरिकांना R.R.R. केंद्रात वस्तू जमा करण्याचे आवाहन
आनंदाच्या सणासोबत सामाजिक बांधिलकी जपा; वापरात नसलेल्या वस्तू गरजूंना मिळणार
पिंपरी, प्रतिनिधी शाम सोनवणे, दि. १६ ऑक्टोबर २०२५, मॅक्स मंथन डेली न्यूज:
प्रकाशाचा, आनंदाचा आणि स्वच्छतेचा उत्सव असलेल्या दिवाळीच्या पार्श्वभूमीवर पिंपरी चिंचवड महापालिकेतर्फे PCMC नागरिकांना पर्यावरणपूरक आणि जबाबदार दिवाळी साजरी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. आरोग्य विभागाने नागरिकांना त्यांच्या घरात वापरात नसलेल्या वस्तू R.R.R. Reduce, Reuse, Recycle केंद्रांमध्ये जमा करण्याची विनंती केली आहे, जेणेकरून शहराचे सौंदर्य अबाधित राहील आणि गरजूंना मदत मिळेल.

स्वच्छ दिवाळी, सुंदर शहर
दिवाळीच्या साफसफाईदरम्यान अनेक घरांमध्ये जुनी खेळणी, कपडे, भांडी, इलेक्ट्रॉनिक वस्तू, फर्निचर आदी अनेक वस्तू फेकून दिल्या जातात. या वस्तू रस्त्यावर टाकल्यास कचऱ्याचे प्रमाण वाढते आणि शहराच्या सौंदर्याला बाधा पोहोचते. यावर उपाय म्हणून, महापालिकेने सुरू केलेल्या R.R.R. सेंटरमध्ये या वस्तू जमा केल्यास त्यांचा पुनर्वापर होऊन गरजूंना थेट फायदा होऊ शकतो.
-
सामाजिक आणि पर्यावरण पूरक उपक्रम: सामाजिक बांधिलकी आणि पर्यावरण संरक्षणाचा संगम साधण्यासाठी PCMC ने शहरभर विविध प्रभागांमध्ये R.R.R. केंद्रे सुरू केली आहेत.
-
कशा वस्तू जमा कराव्यात? नागरिक चांगल्या स्थितीतील, पण घरात वापरात नसलेली पुस्तके, वह्या, शालेय साहित्य, कपडे, चादर, खेळणी, भांडी, फर्निचर, इलेक्ट्रॉनिक उपकरणे, चपला तसेच पुनर्वापर करता येणाऱ्या इतर वस्तू या केंद्रांमध्ये जमा करू शकतात. जमा झालेल्या वस्तूंचे पुनर्वापर किंवा गरजूंना पुनर्वितरण केले जाईल.

