news
Home पिंपरी चिंचवड मोरवाडीकरांना मिळणार हक्काचे विरंगुळा केंद्र! महापौर रवि लांडगे यांच्या हस्ते कामाचे भूमिपूजन

मोरवाडीकरांना मिळणार हक्काचे विरंगुळा केंद्र! महापौर रवि लांडगे यांच्या हस्ते कामाचे भूमिपूजन

दोन मजली वास्तूमध्ये मिळणार व्यायामासह सांस्कृतिक सुविधा; ८ महिन्यात काम पूर्ण करण्याचे महापालिकेचे उद्दिष्ट | © २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज

by maxmanthannews@gmail.com
Spread the love

उद्यानात उभारण्यात येणारे विरंगुळा केंद्र सामाजिक संवादासाठी व्यासपीठ ठरेल – महापौर रवि लांडगे

पिंपरी चिंचवड प्रतिनिधी बालाजी नवले, ८ मे २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:

पिंपरी: “पिंपरी-चिंचवड शहरातील उद्याने ही शहराचा खऱ्या अर्थाने श्वास आहेत. इतर शहरांच्या तुलनेत आपल्या शहरात उद्यानांची संख्या मोठी असून, त्यांचे संगोपन करणे ही आपली सामूहिक जबाबदारी आहे. उद्यानांमध्ये उभारण्यात येणाऱ्या विरंगुळा केंद्रांमुळे सर्व वयोगटातील नागरिकांना व्यायाम, सांस्कृतिक उपक्रम आणि सामाजिक संवादासाठी एक उत्तम व्यासपीठ उपलब्ध होणार आहे,” असे प्रतिपादन महापौर रवि लांडगे यांनी केले.

पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या मोरवाडी येथील देऊबाई कापसे उद्यान परिसरात उभारण्यात येणाऱ्या दोन मजली बहुउद्देशीय विरंगुळा केंद्राच्या कामाचे भूमिपूजन आज महापौर रवि लांडगे यांच्या हस्ते उत्साहात संपन्न झाले.

याप्रसंगी बोलताना महापौर लांडगे म्हणाले की, महापालिकेच्या माध्यमातून शहरातील उद्यानांचे आधुनिकीकरण करण्यावर आणि नागरिकांना दर्जेदार सुविधा उपलब्ध करून देण्यावर विशेष भर दिला जात आहे. या नवीन विरंगुळा केंद्रामुळे परिसरातील ज्येष्ठ नागरिक आणि इतर रहिवाशांच्या जीवनमानात सकारात्मक बदल होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

 या प्रकल्पासाठी ६ लाख ५३ हजार रुपये खर्च अपेक्षित आहे. हे केंद्र दोन मजली असून १८ मीटर बाय ८ मीटर अशा एकूण २८८ चौरस मीटर क्षेत्रात उभारले जाणार आहे. या कामाची मुदत ८ महिने निश्चित करण्यात आली आहे.

या सोहळ्याला उपमहापौर शर्मिला बाबर, नगरसदस्य कुशाग्र कदम, तुषार हिंगे, अनुराधा गोरखे, सुप्रिया चांदगुडे, उपायुक्त अण्णा बोदडे आणि जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक यांच्यासह परिसरातील ज्येष्ठ नागरिक व सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रफुल्ल पुराणिक यांनी केले.


© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!