news
Home पिंपरी चिंचवड ‘सुर निरागस हो…’ ते ‘कानडा राजा पंढरीचा’! – PCMC च्या ‘दिवाळी पहाट २०२५’ मध्ये मराठी-हिंदी गीतांची सुरेल मैफल

‘सुर निरागस हो…’ ते ‘कानडा राजा पंढरीचा’! – PCMC च्या ‘दिवाळी पहाट २०२५’ मध्ये मराठी-हिंदी गीतांची सुरेल मैफल

आकुर्डीतील ग.दि. माडगूळकर नाट्यगृहात संगीतप्रेमींची गर्दी; गायक कोमल कृष्णा, राजेश्वरी पवार, विनल देशमुख आणि गणेश मोरे यांच्या गायनाची जादू. (© २०२५ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.)

by maxmanthannews@gmail.com
Spread the love

‘दीपबंध सुरांचा’: मंगलमय दिवाळी पहाट – रसिकांचे झाले अभ्यंगस्नान!

 


 

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या सांगीतिक सोहळ्यात भावनांच्या शब्दसुरावटीने पहाट उजळली; ‘मिस अर्थ इंडिया’ कोमल चौधरी यांचा गौरव

 

पिंपरी प्रतिनिधी शाम सोनवणे:

प्रकाशाच्या झळाळीने, आनंदाच्या लहरींनी आणि सुरांच्या सुवासिक झुळुकींनी नटलेली दिवाळीची पहाट… कानात झंकारणारे स्वर, भावनांच्या लहरींनी ओथंबलेले वातावरण… आणि शेकडो संगीतप्रेमींची मिळणारी दाद… अशा संगीतमय वातावरणात मंगलसुरांच्या अभ्यंगस्नानाने रसिकांची दिवाळीची पहाट अविस्मरणीय झाली. आकुर्डी प्राधिकरण येथील ग.दि. माडगूळकर नाट्यगृहात सुरांच्या दीपांनी व भावनांच्या शब्दसुरावटीने १८ ऑक्टोबर २०२५ रोजी ही पहाट उजळली.

भारतीय संस्कृतीतील प्रकाश, आनंद आणि स्नेहाचा सण असलेल्या दिवाळीच्या स्वागतासाठी, पिंपरी चिंचवड महापालिकेच्या भारतरत्न पंडित भीमसेन जोशी संगीत अकादमी यांच्या वतीने आयोजित ‘दिवाळी पहाट २०२५ – दीपबंध सुरांचा’ हा विशेष सांस्कृतिक कार्यक्रम उत्साहात पार पडला.

सुरेल मैफलीत भक्ती आणि भावगीतांची बरसात

 

महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर व अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या कार्यक्रमाला उपायुक्त पंकज पाटील, विशेष अधिकारी किरण गायकवाड, प्रशासन अधिकारी उमा दरवेश, क्रीडा अधिकारी रंगराव कारंडे, नाट्यगृह व्यवस्थापक राकेश सौदे, औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे निदेशक बबिता गावंडे, समन्वयक समीर सूर्यवंशी, संगीत शिक्षक नंदीन सरिन, वैजयंती भालेराव, स्मिता देशमुख, संतोष साळवे, उमेश पुरोहित, ग्रंथपाल प्रवीण चाबुकस्वार, प्रतिभा मुनावत, माजी पशु वैद्यकीय अधिकारी डॉ.सतिष गोरे यांच्यासह नागरिक उपस्थित होते.

“सुर निरागस हो…” या भावगीताने कार्यक्रमाची भावपूर्ण सुरुवात झाली, ज्यानंतर गायक-वादकांनी रसिकांच्या मनांवर संगीताची लहर सोडली.

  • गायन: गायक कोमल कृष्णा, राजेश्वरी पवार, विनल देशमुख आणि गणेश मोरे यांनी ‘शोधी सी मानवा’, ‘सूर तेच छेडीता’, ‘अधीर मन झाले’, ‘बहरला हा मधुमास नवा’, ‘पिया तो से नयना लागे रे’, ‘ये हसी वादिया’, ‘मेरे ढोलना सुन’ अशी विविध मराठी आणि हिंदी गीतं सादर करून रसिकांची मने जिंकली.
  • भक्तिरस: बंदिशी वादनांनी कार्यक्रमाला गोडवा आणला, तर ‘कानडा राजा पंढरीचा’ या अभंगातून भक्तिरसाची पेरणी झाली आणि ‘माऊली माऊली रूप तुझे’ या गाण्याच्या सुरांनी संगीतमय तोरण चढवले.
  • वादन: नितीन खंडागळे, सुबोध जैन, दीपक काळे, शाम चंदनशिवे आणि सागर घोडके यांच्या वादनकौशल्याने कार्यक्रमाला अप्रतिम रंग चढवला.

या सुरेल सोहळ्याचे निवेदन रत्ना दहीवेलकर यांनी आपल्या ओघवत्या, कवितामय शैलीत केले.

‘मिस अर्थ इंडिया’ कोमल चौधरी यांचा सन्मान

 

याच कार्यक्रमादरम्यान हरियाणा येथे नुकत्याच झालेल्या ‘मिस डिवाइन ब्युटी २०२५’ स्पर्धेत ‘मिस अर्थ इंडिया २०२५’ हा पुरस्कार मिळवणाऱ्या कोमल चौधरी यांचा महापालिकेच्या वतीने सन्मान करण्यात आला. त्या आता जागतिक स्तरावर होणाऱ्या ‘मिस अर्थ’ स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करणार आहेत. त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.


© २०२५ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!