पिंपळे सौदागरच्या ‘The Aura Thai Spa’ मध्ये वेश्याव्यवसाय; अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाची धडक कारवाई
मालक अभिजित लोरन्स याला अटक; नागालँड, मिझोरामसह ०७ पीडित महिलांची सुटका
पिंपरी चिंचवड प्रतिनिधी बालाजी नवले, दि. ३० नोव्हेंबर २०२५, मॅक्स मंथन डेली न्यूज:
पिंपरी-चिंचवड शहराच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाने (AHTU) पिंपळे सौदागर परिसरात मोठी कारवाई करत, एका प्रतिष्ठित स्पा सेंटरच्या नावाखाली सुरू असलेला वेश्याव्यवसाय उघडकीस आणला आहे. ‘The Aura Thai Spa’ ह्या स्पा सेंटरच्या नावाखाली सुरू असलेला हा अनैतिक प्रकार गुन्हे शाखेच्या पथकाने उघडकीस आणला.

पिंपळे सौदागर येथील रोस आईकॉन बिल्डिंग मधील शॉप नंबर २०२ ते २०४ येथे ‘The Aura Thai Spa’ मध्ये वेश्या व्यवसाय सुरू असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक विभागाला मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी बनावट ग्राहक पाठवून शहानिशा केली आणि त्यानंतर स्पा सेंटरवर छापा टाकून धडक कारवाई केली.
या कारवाईत पोलिसांनी एकूण ०७ पीडित महिलांची सुटका केली. या महिलांमध्ये ईशान्येकडील ५ महिला (०३ नागालँड, ०१ मिझोराम, ०१ त्रिपुरा) आणि इतर दोन महिला (०१ केरळ व ०१ महाराष्ट्र) अशा विविध राज्यातील महिलांचा समावेश आहे.
स्पा सेंटरचा मालक अभिजित लोरन्स (वय ३०, रा. पिंपळे सौदागर, मूळ रा. तिरुअनंतपुरम, केरळ) याने महिलांना पैशांचे आमिष दाखवून वेश्या व्यवसायास प्रवृत्त केल्याचे उघड झाले आहे. पोलिसांनी स्पा मालक अभिजित लोरन्स याच्याविरुद्ध सांगवी पोलीस ठाणे येथे भारतीय न्याय संहिता (IPC) सह पिटा कायद्याप्रमाणे (Prevention of Immoral Trafficking Act) गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे.
सदरची महत्त्वपूर्ण कारवाई पोलीस आयुक्त श्री विनय कुमार चौबे, पोलीस सह आयुक्त डॉ. शशिकांत महावरकर, अप्पर पोलीस आयुक्त श्री सारंग आवाड, पोलीस उपायुक्त गुन्हे डॉ. शिवाजी पवार, सहा. पोलीस आयुक्त गुन्हे १ श्री विशाल हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री नितीन गिते, सहायक पोलीस निरीक्षक श्री भास्कर पुल्ली व पथकाने केली आहे.
© २०२५ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.
