news
Home पिंपरी चिंचवड मोबाईलमुळे तरुण भरकटले, जाती-जातीत भांडणे लावण्याचे षडयंत्र! भारत पाटील यांनी व्यक्त केली तीव्र चिंता

मोबाईलमुळे तरुण भरकटले, जाती-जातीत भांडणे लावण्याचे षडयंत्र! भारत पाटील यांनी व्यक्त केली तीव्र चिंता

रोजगार निर्मिती होत नसल्याने बेरोजगारांचा उद्रेक होईल; कष्टकरी कामगार नेते काशिनाथ नखाते यांचा शासकीय धोरणांवर सडेतोड टीका. (© २०२५ मॅक्स मंथन डेली न्यूज)

by maxmanthannews@gmail.com
Spread the love

‘संवादाची दारे उघडी ठेवा, जुने आदर्श घेऊनच नवी पिढी पुढे जाईल’— माध्यम तज्ञ भारत पाटील

 

 

समता भूमी फुले वाड्यात ‘फुले-आंबेडकर व्याख्यानमाला’ संपन्न; तरुणांमधील बेकारी, व्यसनाधीनता आणि उद्रेकावर चिंता व्यक्त; मोबाईल हे नवे व्यसन असल्याची टीका

 

पिंपरी, पुणे, प्रतिनिधी शाम सोनवणे, दि. ३ डिसेंबर २०२५, मॅक्स मंथन डेली न्यूज:

पुण्यातील समता भूमी फुले वाड्यात आयोजित फुले-आंबेडकर व्याख्यानमालेत तरुणांमधील वाढती बेकारी, व्यसनाधीनता आणि उद्रेक या ज्वलंत विषयावर माध्यम तज्ञ भारत पाटील यांनी आपले विचार मांडले. यावेळी त्यांनी “जुने आदर्श घेऊनच नवी पिढी पुढे जाईल, मात्र आधीच्या पिढीने संवादाची दारे उघडी ठेवावी,” असे महत्त्वपूर्ण आवाहन केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कष्टकरी कामगार नेते काशिनाथ नखाते होते.

भारत पाटील यांनी आपल्या भाषणात व्यसनाची व्याख्या बदलल्याचे नमूद केले. ते म्हणाले, “मोबाईल हेच नवे व्यसन असून, त्या उद्योगाचेही केंद्रीकरण होत आहे.” मोबाईलमुळे तरुण पिढी भरकटत असताना, या गंभीर समस्येकडे लोकांचे लक्ष जाऊ नये म्हणून जाती-जातीत भांडणे लावून दिली जात आहेत. कोवळी मुले याला भक्ष्यस्थानी पडत असल्याबद्दल त्यांनी तीव्र चिंता व्यक्त केली.

  • शैक्षणिक समस्या: उच्च शिक्षणात कमालीची घट झाली आहे. दहावी, बारावी उत्तीर्ण झाल्यावरही विद्यार्थी शाळा सोडल्याचा दाखला आणायला देखील जात नाहीत.

  • उद्रेकाचा धोका: रिकामे हात आणि रिकामे मेंदू यामुळे नवी पिढी व्यसनाधीन होत आहे, त्यातून उद्रेक होण्याचा धोका वाढला आहे. नेपाळ आणि बांगलादेश ही त्याची उदाहरणे असल्याचे प्रतिपादन त्यांनी केले.

भारत पाटील यांनी जुन्या आदर्शांचा आजही सन्मान केला जात असल्याने, त्यांनी नव्या पिढीकडून आशा व्यक्त केली आहे.

अध्यक्षस्थानावरून बोलताना कामगार नेते काशिनाथ नखाते यांनी थेट शासकीय धोरणांवर टीका केली. “एका बाजूला रोजगार निर्मिती करायची नाही आणि दुसऱ्या बाजूला स्वयंरोजगारांना अटकाव करायचा. याची दखल समाजाने घेतली नाही, तर बेरोजगारांचा उद्रेक होईल,” असा इशारा त्यांनी दिला. कामगार आणि व्यवस्थापन यांच्यामध्ये न्यायालय न आणता, सरकारने निर्माण केलेले लवाद हे सरकारी अपत्य असल्याची टीका त्यांनी केली.

प्रास्ताविक भाषणात ओंकार मोरे यांनी आजचा बेरोजगार युवक द्विधा मनस्थितीत असल्याचे सांगितले. आदर्शांना समाजासमोर उभे करायचे आहे, पण उपाशी पोटी तो भरकटत आहे, त्यातून त्याचा उद्रेक होऊ शकतो, अशी भीती त्यांनी व्यक्त केली.

कार्यक्रमाची सुरुवात महात्मा फुले यांच्या अखंडाने झाली. शारदा वाडेकर यांनी सूत्रसंचालन केले, तर प्रतिष्ठानचे हारुण मुजावर यांनी उपस्थितांचे आभारप्रदर्शन केले.


© २०२५ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!