news
Home पिंपरी चिंचवड मतदारांना मतदानापासून वंचित ठेवण्याचे षडयंत्र! प्रारूप यादीतील त्रुटींवर सामाजिक कार्यकर्ते मारुती साहेबराव भापकर आक्रमक

मतदारांना मतदानापासून वंचित ठेवण्याचे षडयंत्र! प्रारूप यादीतील त्रुटींवर सामाजिक कार्यकर्ते मारुती साहेबराव भापकर आक्रमक

'सु-मोटो' (स्वतःहून) दुरुस्ती करूनच निवडणुका घेण्याची आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्याकडे मागणी; सचिन पवार यांनाही तक्रारीची प्रत सादर. (© २०२५ मॅक्स मंथन डेली न्यूज)

by maxmanthannews@gmail.com
Spread the love

‘प्रारूप मतदार यादीतील गोंधळ ही नजरचूक नव्हे, घटनात्मक गंभीर गुन्हाच!’ – मारुती भापकर यांची आयुक्तांकडे तक्रार

 

 

अंतिम मुदत संपल्याने चिंता व्यक्त; ‘सु-मोटो’ दुरुस्ती करूनच निवडणुका घेण्याची आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्याकडे मागणी

 

पिंपरी चिंचवड प्रतिनिधी बालाजी नवले, दि. ३ डिसेंबर २०२५, मॅक्स मंथन डेली न्यूज:

पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रसिद्ध करण्यात आलेल्या प्रारूप मतदार यादीतील गंभीर त्रुटी आणि सावळा गोंधळ हा केवळ प्रशासकीय दोष नसून, तो “घटनात्मक गंभीर गुन्हा” आहे, असा थेट आरोप सामाजिक कार्यकर्ते मारुती साहेबराव भापकर (रा. मोहन नगर, चिंचवड) यांनी केला आहे. त्यांनी आज (दि. ३ डिसेंबर २०२५) आयुक्त तथा निवडणूक अधिकारी श्रावण हर्डीकर यांना पत्र लिहून, अंतिम यादी जाहीर करण्यापूर्वी महापालिकेने ‘सु-मोटो’ (स्वतःहून) दुरुस्ती करावी, अशी मागणी केली आहे.

भापकर यांनी यापूर्वी २५ नोव्हेंबर २०२५ रोजीही त्रुटींबाबत पत्र दिले होते.

महापालिका निवडणुकीसाठी महाराष्ट्र निवडणूक आयोगाकडून प्राप्त झालेल्या मतदार याद्या ३२ प्रभागनिहाय फोडून २० नोव्हेंबर २०२५ रोजी प्रसिद्ध करण्यात आल्या होत्या. या यादीवर आक्षेप नोंदवण्याची मुदत आज, ३ डिसेंबर २०२५ रोजी संपुष्टात येत आहे. मारुती भापकर यांनी प्रारूप यादीतील खालील गंभीर समस्या निदर्शनास आणून दिल्या आहेत:

  • दुबार/तिबार नावे: शहरातील प्रभागांमध्ये एक लाखापेक्षा अधिक दुबार आणि तिबार मतदार नावे समाविष्ट आहेत.

  • मतदारांचे स्थलांतर: हजारो मतदारांची नावे मूळ प्रभागातून शेजारच्या प्रभागात परस्पर समाविष्ट करण्यात आली आहेत. उदा. प्रभाग क्रमांक १४ मधील याद्या, भाग व परिसरातील नावे प्रभाग क्रमांक १० व इतर प्रभागात समाविष्ट झाले आहेत.

  • मृत व्यक्तींची नावे: शेकडो मृत व्यक्तींची नावे अद्यापही याद्यांमध्ये आहेत.

  • राजकीय हस्तक्षेप: राजकीय हस्तक्षेपामुळे आणि स्थळ निरीक्षण न करता या याद्या फोडताना संपूर्ण यादी, भाग किंवा परिसर परस्पर दुसऱ्याच प्रभागात समाविष्ट झाले आहेत.

  • जनजागृतीकडे दुर्लक्ष: वर्षानुवर्षे आपले नाव मूळ प्रभागात आहे, या गृहीतकामुळे अनेक मतदारांनी या गंभीर बाबीकडे दुर्लक्ष केले असून, यामुळे मतदारांना प्रत्यक्ष मतदानाच्या वेळी शारीरिक, मानसिक, आर्थिक त्रासाला सामोरे जावे लागणार आहे आणि ते मतदानापासून वंचित राहू शकतात.

भापकर यांनी पत्रात नमूद केले आहे की, सर्वोच्च न्यायालयाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ३१ जानेवारीपर्यंत घेण्याचे आदेश आयोगाला दिले असले तरी, या गंभीर त्रुटी व दोषांसह निवडणुका घ्या असे निर्णयात म्हटलेले नाही.

त्यामुळे, पिंपरी-चिंचवड शहरातील एकूण ३२ प्रभागातील वरील सर्व गंभीर त्रुटी व दोष दूर करूनच आयोगाच्या वतीने सु-मोटो (स्वतःहून दुरुस्ती) करूनच अंतिम यादी जाहीर करावी, अशी नम्र विनंती मारुती भापकर यांनी आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्याकडे केली आहे.

या पत्राची प्रत सहाय्यक आयुक्त तथा उप निवडणूक अधिकारी श्री सचिन पवार यांनाही पाठवण्यात आली आहे.


© २०२५ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!