पिंपरी-चिंचवड ‘रेबीजमुक्त’ होणार! पीसीएमसी-मिशन रेबीज नियंत्रण कार्यक्रमाचा भव्य शुभारंभ
अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे यांचे प्रतिपादन; आधुनिक तंत्रज्ञान, प्रशिक्षित पथके आणि विशेष हेल्पलाईन +९१८७८८०७०६६५ कार्यान्वित
पिंपरी चिंचवड प्रतिनिधी बालाजी नवले, दि. ३ डिसेंबर २०२५, मॅक्स मंथन डेली न्यूज:
पिंपरी-चिंचवड शहर पूर्णपणे रेबीजमुक्त करण्याचे ध्येय साधण्यासाठी पिंपरी चिंचवड महानगरपालिका आणि मिशन रेबीज यांच्या संयुक्त विद्यमाने महत्त्वाकांक्षी ‘पीसीएमसी रेबीज नियंत्रण कार्यक्रम’ सुरू करण्यात आला आहे. नागरिकांच्या आरोग्य, सुरक्षितता आणि जनजागृतीसाठी अत्यंत उपयुक्त असलेल्या या कार्यक्रमाचा औपचारिक शुभारंभ आज (दिनांक २ डिसेंबर २०२५) निगडी येथील ग. दि. माडगूळकर नाट्यगृह येथे अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे यांच्या हस्ते करण्यात आला.
अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे यांनी यावेळी बोलताना सांगितले की, आधुनिक तंत्रज्ञान, प्रशिक्षित पथके आणि मजबूत व्यवस्थापन प्रणाली यांच्या आधारे हा कार्यक्रम राबवला जात आहे. नागरिकांच्या सहभागासोबत तांत्रिक व शास्त्रीय पद्धतींचा एकत्रित उपयोग करून सर्वंकष रेबीज नियंत्रण साध्य करण्यावर महापालिका विशेष भर देत आहे.
‘पीसीएमसी रेबीज नियंत्रण कार्यक्रम’ वर्षभर राबविण्यात येणार असून, या अनुषंगाने खालील घटकांचे लोकार्पण करण्यात आले:
-
विशेष हेल्पलाईनचे उद्घाटन
-
लसीकरण पथके (Vaccination Teams) आणि
-
रेबीज रिस्पॉन्स टीम (RRT) साठी नियुक्त करण्यात आलेल्या वाहनांचे लोकार्पण.
यावेळी महापालिका उपायुक्त संदीप खोत, सहाय्यक आयुक्त श्यामकांत पाटील, सहायक आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. किशोरी नलावडे, एमएसडी कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. यश गोयल, मिशन रेबीजचे संचालक डॉ. मुरगून अप्पूपिल्लई, लॉजिस्टिक संचालक प्रविण ओवळ यांच्यासह महापालिकेचे अधिकारी-कर्मचारी आणि नागरिक उपस्थित होते.
अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे म्हणाले, रेबीजमुक्त शहराच्या दिशेने टाकलेले हे एक अत्यंत महत्त्वपूर्ण पाऊल आहे. वैज्ञानिक पद्धती, प्रशिक्षित पथकांची तैनाती आणि मजबूत देखरेख व्यवस्था यांच्या मदतीने हा कार्यक्रम प्रभावीपणे राबवण्यासाठी महापालिका कटिबद्ध आहे. मिशन रेबीज आणि एमएसडी ॲनिमल हेल्थ यांच्या सहकार्यामुळे हा उपक्रम अधिक सक्षम आणि परिणामकारक ठरेल.
-
हा उपक्रम मिशन रेबीज प्रकल्पाने सिद्ध केलेल्या जागतिक ख्यातीच्या मॉडेलवर आधारित आहे.
-
या प्रकल्पांतर्गत प्रशिक्षित पथके संपूर्ण शहरात कुत्र्यांचे लसीकरण करतील. यासाठी वर्ल्ड व्हेटरिनरी सर्व्हिस (डब्लूवीएस) अॅप आणि जीआयएस आधारित मॅपिंग तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येणार आहे.
रेबीज नियंत्रण अधिक प्रभावी करण्यासाठी महापालिकेच्या पशुवैद्यकीय विभागामार्फत विशेष रेबीज हेल्पलाईन (+918788070665) सुरू करण्यात आली आहे.
-
उद्देश: नागरिकांना रेबीजची शंका असलेले किंवा संशयास्पद प्राणी येथे कळवता येतील.
-
या हेल्पलाईनसाठी एक विशेष रेबीज रिस्पॉन्स टीम (RRT) सज्ज ठेवण्यात आली आहे, जी तत्काळ तपासणी करून आवश्यक ती कारवाई करणार आहे. मिशन रेबीज हे नॉलेज पार्टनर म्हणून महापालिकेच्या देखरेख पथकासोबत काम करणार आहे.
“मिशन रेबीजसारख्या जागतिक ख्यातीच्या संस्थेसोबतच्या भागीदारीमुळे लसीकरण, देखरेख आणि जनजागृती या तिन्ही घटकांना भक्कम आधार मिळत आहे. सर्व विभागांच्या समन्वयाने हा कार्यक्रम प्रभावीपणे राबविण्यात येईल आणि आम्ही भविष्यात रेबीजमुक्त समुदाय निर्माण करण्यास महापालिका सातत्याने प्रयत्नशील आहे.”
– संदीप खोत, उपायुक्त, पिंपरी चिंचवड महापालिका
© २०२५ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.
