‘सेवा विकास बँक बचाव कृती समिती’ स्थापन; पुन्हा परवाना बहाल करून बँक सुरू करण्याची सभासदांची एकमुखी मागणी
कामगार नेते यशवंतभाऊ भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली पिंपरीतील मेळाव्यात निर्णय; माजी संचालक संपतराव ओव्हाळ अध्यक्षपदी
पिंपरी प्रतिनिधी शाम सोनवणे, दि. ८ डिसेंबर २०२५, मॅक्स मंथन डेली न्यूज:
सेवा विकास सहकारी बँक लिमिटेड पिंपरी च्या सभासदांचा प्रथम मेळावा रविवार, दि. ७ डिसेंबर २०२५ रोजी संत तुकाराम हॉल (संत तुकाराम नगर) पिंपरी येथे मोठ्या उत्साहात पार पडला. यावेळी मोठ्या संख्येने बँकेचे सभासद उपस्थित होते. या मेळाव्यात कामगारनेते यशवंतभाऊ भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली कामगार, सभासद, ठेवीदार आणि खातेदार यांच्यावतीने सेवा विकास बँक बचाव कृती समिती स्थापन करण्यात आली.
या नव्याने स्थापन झालेल्या समितीच्या अध्यक्षपदी माजी संचालक संपतराव बुवाजीराव ओव्हाळ यांची निवड करण्यात आली.
या मेळाव्यात कामगारनेते यशवंतभाऊ भोसले, माजी संचालक अशोक दखनेजा, माजी संचालक व्ही. टी. जोगदंड, सुशील बजाज आणि नंदू आप्पा कदम यांची भाषणे झाली.
यशवंतभाऊ भोसले यांनी कर्मचाऱ्यांच्या वतीने बँकेच्या लिक्विडेटरकडून झालेल्या अन्यायाची माहिती दिली. लिक्विडेटरने महाराष्ट्र शासन आणि कामगार विभागाची कोणतीही परवानगी न घेता २०५ कर्मचाऱ्यांना कामावरून काढले आणि बँकेचे काही विभाग बंद केले. संघटनेच्या तक्रारीनंतर कामगार आयुक्त मुंबई यांनी चौकशीसाठी अधिकारी पाठवल्याचे कळताच, कर्मचाऱ्यांच्या खात्यावर थकीत वेतनाच्या ८ ते १० टक्के (जवळपास दोन ते तीन लाख) रक्कम जमा करण्यात आल्याची माहिती यशवंतभाऊ भोसले यांनी दिली.
मेळाव्यात उपस्थित सर्व सभासद, ठेवीदार, ग्राहक आणि कर्मचारी यांनी बँक पुन्हा सुरू करण्याची एकमुखाने मागणी केली.
कामगार नेते यशवंतभाऊ भोसले यांनी सेवा विकास सहकारी बँक मर्यादित बचाव कृती समितीची स्थापना करण्याची घोषणा करताच, माजी संचालक अशोकराव दखनेजा यांनी तो ठराव मेळाव्यात मांडला आणि त्यास व्ही. टी जोगदंड यांनी अनुमोदन दिले. एस बी ओव्हाळ यांची कृती समितीच्या अध्यक्षपदी निवड करण्याचा ठरावही यावेळी मंजूर करण्यात आला.
कृती समितीच्या वतीने खालील महत्त्वाचे ठराव मंजूर करण्यात आले:
-
बँकेचा परवाना पुन्हा बहाल करणे: रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) रद्द केलेला परवाना पुन्हा प्राप्त करण्यात यावा आणि बँकेचे कार्य पुन्हा सुरू करण्यास परवानगी देण्यात यावी.
-
लिक्विडेटरला पदमुक्त करणे: लिक्विडेटर यांची सध्याची नियुक्ती रद्द करून त्यांना पदमुक्त करण्यात यावे आणि बँकेचे संपूर्ण नियंत्रण पुन्हा संबंधित सभासदांच्या ताब्यात देऊन त्यांना व्यवस्थापक संचालक मंडळ निवडण्याचे अधिकार बहाल करण्यात यावेत.
-
कर्मचाऱ्यांचे पुनर्समायोजन: २०५ कर्मचाऱ्यांना पूर्ववत कामावर घेऊन त्यांचे थकीत मागील तीन वर्षांचे वेतन त्वरित देण्यात यावे.
-
विलीनीकरण अथवा हस्तांतरणास विरोध: सेवा विकास को-ऑपरेटिव्ह बँकेच्या स्थापनेला पन्नास वर्षे पूर्ण झाली असून, ही व्यापाऱ्यांनी उभी केलेली सहकारी बँक प्रत्येकाच्या अस्मितेचा प्रश्न आहे. त्यामुळे ही बँक इतर कोणत्याही सहकारी वित्तीय संस्थेत विलीन अथवा हस्तांतरित करू नये.
हे सर्व ठराव माननीय आयुक्त सहकार, महाराष्ट्र शासन, पुणे यांना तसेच लिक्विडेटर, सेवा विकास को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड यांना सभासदांच्या स्वाक्षरीने पाठवण्याचे यावेळी ठरले.
पिंपरी चिंचवड शहरातील सर्व सभासद, व्यापारी व ग्राहक, ठेवीदार यांनी कृती समितीच्या पाठीशी उभे राहण्याची जबाबदारी उपस्थित सभासदांनी घेतली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार सिद्धार्थ ओव्हाळ यांनी केले.
© २०२५ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

