पिंपळे सौदागरमध्ये ‘स्पा’च्या नावाखाली सुरू असलेल्या वेश्याव्यवसायाचा पर्दाफाश; गुन्हे शाखेची मोठी कारवाई
शैक्षणिक आणि वैद्यकीय संस्थांच्या इमारतीत चालत होता अनैतिक व्यापार; मालकासह मॅनेजरवर गुन्हा दाखल
पिंपरी चिंचवड प्रतिनिधी बालाजी नवले, दि.२० डिसेंबर २०२५, मॅक्स मंथन डेली न्यूज:
रहाटणी/पिंपरी: पिंपरी-चिंचवड शहरात स्पा सेंटरच्या नावाखाली सुरू असलेल्या वेश्याव्यवसायावर गुन्हे शाखेच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाने (AHTU) मोठी कारवाई केली आहे. पिंपळे सौदागर येथील ‘रॉयल ट्रॅन्कीअल’ इमारतीत असलेल्या एका स्पा सेंटरवर छापा टाकून पोलिसांनी पीडित महिलेची सुटका केली असून याप्रकरणी दोन जणांवर गुन्हा दाखल केला आहे.
पिंपळे सौदागर येथील कोकणे चौकातील चितळे बंधू स्वीट्स असलेल्या ‘रॉयल ट्रॅन्कीअल’ या इमारतीच्या चौथ्या मजल्यावर शॉप नंबर ४०३ मध्ये ‘लेमनग्रास थाई स्पा’ (lemongrass thai spa) सुरू होते. या ठिकाणी वेश्याव्यवसाय चालत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार १८ डिसेंबर २०२५ रोजी सायंकाळी ५:५५ च्या सुमारास पोलिसांनी बनावट गिऱ्हाईक पाठवून या ठिकाणी धाड टाकली.
या कारवाईत पोलिसांनी एका आरोपीला अटक केली असून दुसऱ्याचा शोध सुरू आहे:
१) ओंकार विनायक जोशी (वय २६, रा. दत्तवाडी, पुणे) – याला पोलिसांनी अटक केली आहे.
२) कल्याण भोसले (वय अंदाजे ४३) – याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आरोपी हे पीडित महिलेला पैशांचे आमिष दाखवून तिच्याकडून वेश्याव्यवसाय करून घेत होते आणि त्यातून मिळालेल्या पैशांवर स्वतःची उपजीविका भागवत असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.
विशेष म्हणजे, ज्या इमारतीत हा अनैतिक प्रकार सुरू होता, तिथे मोठ्या प्रमाणावर शैक्षणिक आणि वैद्यकीय संस्था कार्यरत आहेत:
-
तिसऱ्या मजल्यावर: ८ वी ते १२ वी पर्यंतचे ‘एम्स इन्स्टिट्यूट’चे क्लासेस.
-
दुसऱ्या मजल्यावर: डॉ. हिना खेरानी यांचे स्किन क्लिनिक आणि डॉ. अनन्या पेटकर यांचे ‘FYNE IVF सेंटर’ हॉस्पिटल.
अशा संवेदनशील आणि सार्वजनिक ठिकाणी वेश्याव्यवसाय चालवून कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी काळेवाडी पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS) कलम १४३(२) आणि अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंध कायदा १९५६ च्या कलम ३, ४, ५, ७ नुसार गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
ही कारवाई महिला पोलीस हवादार निलम संतोष बुचडे यांच्या फिर्यादीवरून करण्यात आली असून, पुढील तपास पोलीस निरीक्षक धुमाळ करत आहेत.
© २०२५ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.
