‘मजूर शक्ती हीच राष्ट्र शक्ती’; पुणे आणि पिंपरी-चिंचवड मनपा निवडणुकीत ‘महाराष्ट्र मजूर पक्ष’ सर्व जागांवर लढणार
सत्ताधाऱ्यांनी कष्टकऱ्यांकडे दुर्लक्ष केले; भ्रष्टाचाराची श्वेतपत्रिका काढा, अन्यथा न्यायालयात जाणार – भाऊसाहेब अडागळे यांचा इशारा
पिंपरी, पुणे, दि.२० डिसेंबर २०२५, मॅक्स मंथन डेली न्यूज:
पिंपरी, पुणे (दि. १९ डिसेंबर २०२५): आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे बिगुल वाजले असून, पुणे आणि पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या सर्व प्रभागांमध्ये ‘महाराष्ट्र मजूर पक्ष’ स्वबळावर निवडणूक लढवणार असल्याची घोषणा पक्षाचे संस्थापक अध्यक्ष भाऊसाहेब अडागळे यांनी केली आहे. “मजूर शक्ती हीच राष्ट्र शक्ती” हे ब्रीदवाक्य घेऊन कष्टकरी आणि मजुरांचा आवाज सभागृहात पोहोचवण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.
शुक्रवारी पिंपरी येथे आयोजित पत्रकार परिषदेत अडागळे बोलत होते. यावेळी पुणे जिल्हाध्यक्ष शिवाजी चव्हाण, महिला शहराध्यक्ष सविता आव्हाड, सुरेश मिसाळ, मोहन कांबळे यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.
भाऊसाहेब अडागळे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपवर टीका करताना सांगितले की, दोन्ही पक्षांनी सत्ता उपभोगली, परंतु झोपडपट्टीतील कष्टकरी मजुरांच्या समस्यांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले.
-
एसआरए (SRA) प्रकल्पातील सावळागोंधळ: पिंपरी-चिंचवडमधील ७८ झोपडपट्ट्यांमध्ये पुनर्वसन प्रकल्प राबवण्यासाठी पक्ष ३० वर्षांपासून पाठपुरावा करत आहे. मात्र, सध्या सुरू असलेल्या प्रकल्पांमध्ये बिल्डर, गावगुंड आणि भ्रष्ट अधिकारी सर्वसामान्यांना त्रास देत असल्याचा आरोप त्यांनी केला.
-
आरोग्य व्यवस्थेचे तीनतेरा: वायसीएम (YCM) सह ७ मोठ्या रुग्णालयांमध्ये पुरेशी कर्मचारी संख्या नाही. कंत्राटी पद्धतीने अकुशल कामगार नेमून रुग्णांच्या जिवाशी खेळ सुरू असल्याचा दावा अडागळे यांनी केला.
-
बीआरटी आणि मेट्रोचे प्रश्न: शहरातील बीआरटी मार्ग पार्किंग झोन झाले आहेत. मेट्रोच्या संथ कामामुळे वाहतुकीचा बोजवारा उडाला असून, बीआरटी हटवून रस्ते रुंद करण्याची मागणी त्यांनी केली.
गेल्या चार वर्षांपासून महापालिकेत प्रशासकीय राजवट असताना झालेल्या कामांमध्ये मोठा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करत, अडागळे यांनी सर्व विकास प्रकल्पांची ‘श्वेतपत्रिका’ प्रसिद्ध करण्याची मागणी केली आहे. प्रशासनाने माहिती जाहीर न केल्यास उच्च न्यायालयात दाद मागण्याचा इशाराही त्यांनी दिला.
भाऊसाहेब अडागळे यांनी यापूर्वी शरद पवार, सुरेश कलमाडी आणि डॉ. अमोल कोल्हे यांच्यासारख्या दिग्गज नेत्यांविरोधात लोकसभा निवडणुका लढवल्या आहेत. त्यांच्या उमेदवारांमुळे अनेक प्रस्थापित पक्षांचे गणित बिघडल्याचा इतिहास आहे. याच ताकदीच्या जोरावर आगामी निवडणुकीत कष्टकऱ्यांचे हक्काचे प्रतिनिधी निवडून आणण्याचा निर्धार महाराष्ट्र मजूर पक्षाने केला आहे.
© २०२५ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.
