49
मुख्यमंत्री सहाय्यता निधी आणि टाटा ट्रस्टच्या मदतीने अकोल्याच्या प्रशांत इंगळे यांना मिळाले नवजीवन; नानावटी रुग्णालयात यशस्वी यकृत प्रत्यारोपण!
अकोला/पिंपरी, प्रतिनिधी जयकुमार चर्जन दि. ६ ऑगस्ट २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:
अकोला: अत्यंत प्रतिकूल आर्थिक परिस्थितीमुळे २५ ते ३० लाख रुपयांचा यकृत प्रत्यारोपणाचा खर्च उचलणे अशक्य झालेल्या अकोला येथील प्रशांत इंगळे (वय ४७) यांना मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी आणि टाटा ट्रस्टच्या मदतीमुळे नवजीवन मिळाले आहे. मुंबईतील नामांकित नानावटी रुग्णालयात त्यांच्यावर यशस्वी यकृत प्रत्यारोपण (Liver Transplant) करण्यात आले. या कठीण प्रसंगी त्यांच्या पत्नी वर्षा इंगळे यांनी स्वतःच्या यकृताचा काही भाग दान करून पतीला जीवनदान दिले.
अकोला येथे केबल टाकण्याचे काम करणारे प्रशांत इंगळे हे आपल्या कुटुंबाचे एकमेव कमावते व्यक्ती आहेत. त्यांच्या कुटुंबात वृद्ध आई-वडील, पत्नी, महाविद्यालयीन मुलगी आणि दहावीतील मुलगा आहे. सप्टेंबर-ऑक्टोबर २०२५ मध्ये यकृत निकामी झाल्याचे निदान झाल्यानंतर डॉक्टरांनी तातडीने प्रत्यारोपणाचा सल्ला दिला होता.
कठीण प्रसंगी अकोल्याच्या आमदारांच्या सल्ल्यानुसार इंगळे कुटुंबीयांनी मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्षाचे प्रमुख रामेश्वर नाईक यांची भेट घेतली. नाईक यांनी दाखवलेल्या तत्परतेमुळे मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीतून २ लाख रुपये मंजूर झाले. टाटा ट्रस्टकडून १९ लाख ६० हजार रुपयांची घसघशीत मदत मिळाली. अशा प्रकारे एकूण २१ लाख ६० हजार रुपयांचा निधी उभा राहिल्याने अत्यंत खर्चिक असलेली ही शस्त्रक्रिया शक्य झाली.
२५ जून २०२६ रोजी नानावटी रुग्णालयात पत्नी वर्षा इंगळे यांच्या दातृत्वातून यशस्वी प्रत्यारोपण पार पडले. शस्त्रक्रियेनंतर तब्येतीत मोठी सुधारणा झाल्याने १३ जुलै २०२६ रोजी त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. सध्या प्रशांत यांची प्रकृती अत्यंत स्थिर असून ते पूर्ण बरे होत आहेत. वेळेवर मिळालेल्या आर्थिक मदतीबद्दल इंगळे कुटुंबीयांनी मुख्यमंत्री, रामेश्वर नाईक व टाटा ट्रस्टचे मनापासून आभार मानले.
“आर्थिक अडचणींमुळे कोणत्याही गरजू रुग्णाचा उपचार पैशांअभावी थांबू नये, या उद्देशाने मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्ष सातत्याने कार्यरत आहे. प्रशांत इंगळे यांना वेळेत मदत उपलब्ध करून देता आली, याचा आम्हाला आनंद आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी किंवा अधिक माहितीसाठी नागरिकांनी १८०० १२३ २२११ या टोल-फ्री क्रमांकावर संपर्क साधावा.”— रामेश्वर नाईक, प्रमुख, मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्ष
© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.
