news
Home मुख्यपृष्ठ जिगरबाज कामगारापुढे चोरटे हतबल! शिक्रापूर-चाकण रस्त्यावर एटीएम लुटण्याचा डाव उधळला

जिगरबाज कामगारापुढे चोरटे हतबल! शिक्रापूर-चाकण रस्त्यावर एटीएम लुटण्याचा डाव उधळला

न्हावरे गावातून चोरलेली पिकअप गुन्ह्यासाठी वापरली; १.५० लाख रुपयांची रोकड सुरक्षित, शिक्रापूर पोलिसांकडून चोरट्यांचा शोध सुरू. (© २०२६ | मॅक्स मंथन डेली न्यूज)

by maxmanthannews@gmail.com
Spread the love

टायर दुकानावरील कामगाराच्या सतर्कतेने एटीएम चोरीचा प्रयत्न फसला! १.५० लाखांची रोकड बचावली; चोरटे पिकअप सोडून फरार


शिरूर/शिक्रापूर, २३ जानेवारी २०२६ | मॅक्स मंथन डेली न्यूज:

शिरूर/शिक्रापूर : पुणे-नगर महामार्गावरील शिक्रापूर जवळ असलेल्या करंदी (ता. शिरूर) गावातील एका एटीएम केंद्रावर डल्ला मारण्याचा पाच चोरट्यांचा प्रयत्न टायर दुकानावरील एका सतर्क कामगाराने हाणून पाडला. चोरट्यांनी एटीएम मशीन उचकटून पिकअप गाडीत टाकली होती, मात्र नागरिक गोळा झाल्यामुळे चोरटे चोरीचे मशीन आणि पिकअप गाडी घटनास्थळीच सोडून पसार झाले. या सतर्कतेमुळे मशिनमधील १ लाख ५० हजार रुपयांची रोकड सुरक्षित राहिली आहे.

शिक्रापूर-चाकण रस्त्यावर करंदी गावच्या हद्दीत एका खासगी बेंगळुरूस्थित कंपनीचे ‘व्हाईट लेबल’ एटीएम केंद्र आहे. मंगळवारी पहाटे २:३० च्या सुमारास पाच चोरटे एका पिकअप गाडीतून आले. त्यांनी एटीएम केंद्राचे शटर तोडून मशिनला दोरखंड बांधला आणि पिकअपच्या साह्याने मशीन बाहेर ओढले. या प्रक्रियेत मोठा आवाज झाल्याने शेजारील टायर पंक्चरच्या दुकानात झोपलेला कामगार जागा झाला.

कामगार बाहेर आला असता त्याला पाच जण संशयास्पदरित्या मशीन ओढताना दिसले. चोरट्यांनी त्या कामगाराला जीवे मारण्याची धमकी दिली. मात्र, न डगमगता कामगार पुन्हा दुकानात शिरला आणि त्याने ज्या इमारतीत एटीएम आहे, त्या मालकाला तातडीने फोन करून जागे केले. इमारतीचे मालक आणि आजूबाजूचे नागरिक तात्काळ घटनास्थळी धावून आले. लोक येत असल्याचे पाहून चोरट्यांनी घाबरून पळ काढला.

घटनेची माहिती मिळताच शिक्रापूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दीपरतन गायकवाड यांच्यासह पथकाने घटनास्थळी धाव घेतली. तपासात धक्कादायक माहिती समोर आली की, चोरट्यांनी गुन्ह्यासाठी वापरलेली पिकअप गाडी देखील शिरूर तालुक्यातील न्हावरे गावातून सोमवारी पहाटे चोरली होती. याप्रकरणी ५३ वर्षीय शेतकऱ्याने आधीच तक्रार नोंदवली होती.

पोलीस निरीक्षक दीपरतन गायकवाड यांनी सांगितले की, “एटीएम मशीनमधील १.५० लाख रुपये सुरक्षित आहेत. चोरट्यांच्या शोधासाठी दोन पथके तैनात करण्यात आली असून परिसरातील सीसीटीव्ही फुटेज आणि काही महत्त्वाचे धागेदोरे पोलिसांच्या हाती लागले आहेत. लवकरच आरोपींना अटक केली जाईल.”


© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!