news
Home मुख्यपृष्ठ “कर्तव्यासोबतच सामाजिक बांधिलकी!” चिखलदऱ्यात वनरक्षकांचे महारक्तदान; प्रशिक्षणासोबतच राष्ट्रसेवेचा वसा

“कर्तव्यासोबतच सामाजिक बांधिलकी!” चिखलदऱ्यात वनरक्षकांचे महारक्तदान; प्रशिक्षणासोबतच राष्ट्रसेवेचा वसा

ग्रामीण रुग्णालयाच्या सहकार्याने आरोग्य तपासणी उत्साहात; तुकडी क्रमांक ६३ आणि कर्मचाऱ्यांचा रक्तदानात उत्स्फूर्त सहभाग. (@ २०२६ | मॅक्स मंथन डेली न्यूज)

by maxmanthannews@gmail.com
Spread the love

वनरक्षकांचा राष्ट्रसेवेचा अनोखा संदेश! चिखलदरा वन प्रशिक्षण संस्थेत महारक्तदान व आरोग्य शिबिर संपन्न


चिखलदरा, ३० जानेवारी २०२६ | मॅक्स मंथन डेली न्यूज:

चिखलदरा : भारतीय प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून चिखलदरा येथील वन प्रशिक्षण संस्थेमध्ये महारक्तदान आणि मोफत आरोग्य तपासणी शिबिर उत्साहात पार पडले. प्रशिक्षणासोबतच सामाजिक जबाबदारीचे भान राखत वनरक्षकांनी रक्तदानातून राष्ट्रसेवेचा संदेश दिला असून, या उपक्रमाला प्रशिक्षणार्थी व कर्मचाऱ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

संस्थेच्या संचालिका कु. मुक्ताबाई टेकाळे यांच्या मार्गदर्शनाखाली या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. अमिक्षित वनरक्षक तुकडी क्रमांक ६३, लिपिक व लेखापाल पायाभूत प्रशिक्षणार्थी, तसेच संस्थेतील सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी या सामाजिक कार्यात सहभाग घेतला. सकाळी १० वाजल्यापासून सुरू झालेल्या या उपक्रमात अनेक रक्तदात्यांनी रक्तदान करून सामाजिक बांधिलकीचा आदर्श निर्माण केला.

चिखलदरा ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक आणि त्यांच्या संपूर्ण वैद्यकीय चमूने या शिबिरासाठी तांत्रिक व वैद्यकीय सहकार्य पुरवले. याप्रसंगी केवळ रक्तदानच नव्हे, तर प्रशिक्षणार्थींची मोफत आरोग्य तपासणीही करण्यात आली. यशस्वी आयोजनासाठी कवायत शिक्षक सुधीर भाऊराव आकेवार, कु. शिल्पा घाटे (वनरक्षक), नितीन बघाय, महादेव धुळे यांच्यासह संपूर्ण कर्मचारीवृंदाने विशेष परिश्रम घेतले.

यावेळी बोलताना संचालिका कु. मुक्ताबाई टेकाळे म्हणाल्या की, “प्रजासत्ताक दिन हा केवळ उत्सव नसून कर्तव्याची जाणीव करून देणारा दिवस आहे. वनरक्षक व शासकीय कर्मचाऱ्यांनी प्रशिक्षणासोबतच सामाजिक जबाबदारीचे भान ठेवणे आवश्यक आहे. आजचे रक्तदान अनेक गरजू रुग्णांचे प्राण वाचविण्यास मोलाचे ठरेल.”

या उपक्रमामुळे वन विभागाच्या कर्मचाऱ्यांमध्ये सामाजिक बांधिलकीची भावना अधिक दृढ झाल्याचे पाहायला मिळाले.


© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!