खारघर येथील ३५० व्या शहीदी समागमासाठी महापालिका सज्ज! भाविकांच्या सेवेसाठी महापौर रवी लांडगे यांचा पुढाकार; शहरात जनजागृतीसह विशेष सोयीसुविधांचे नियोजन
पिंपरी चिंचवड प्रतिनिधी बालाजी नवले, १४ फेब्रुवारी २०२६ | मॅक्स मंथन डेली न्यूज:
पिंपरी : नवी मुंबईतील खारघर येथे २८ फेब्रुवारी आणि १ मार्च २०२६ रोजी आयोजित ‘हिंद-दी-चादर’ श्री गुरु तेग बहादूर साहिब जी यांच्या ३५० व्या शहीदी समागमासाठी पिंपरी-चिंचवड शहरातून मोठ्या संख्येने भाविक सहभागी होणार आहेत. या पार्श्वभूमीवर, शहरातून जाणाऱ्या भाविकांची कोणतीही गैरसोय होऊ नये यासाठी महापालिका प्रशासन सर्वतोपरी सहकार्य करण्यास कटिबद्ध आहे, असे प्रतिपादन महापौर रवी लांडगे यांनी केले.
पिंपरी येथील मुख्य प्रशासकीय इमारतीत दिवंगत महापौर मधुकरराव पवळे सभागृहात या समागमाच्या नियोजनासाठी विशेष समन्वय बैठक पार पडली. या बैठकीत महापौरांनी भाविकांच्या प्रवासासाठी वाहतूक व्यवस्था, पिण्याचे पाणी आणि वैद्यकीय मदतीचे नियोजन करण्याचे निर्देश दिले.
या कार्यक्रमासाठी पिंपरी-चिंचवडमधील शीख, सिकलकर, बंजारा, लबाना, सिंधी, महोयाल, वाल्मिकी, उदासीन आणि भागवत संप्रदायातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत. गुरुद्वारा प्रबंधन समितीने भाविकांच्या प्रवासासाठी नियोजित बसेस आणि एकूण संख्येबाबत बैठकीत सविस्तर माहिती दिली.
बैठकीत गुरु तेग बहादूर साहिब जी यांच्या बलिदानाची प्रेरणा नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्यासाठी महत्त्वाच्या सूचना मांडण्यात आल्या:
-
शालेय उपक्रम: महापालिका शाळांमध्ये वक्तृत्व, निबंध आणि गायन स्पर्धांचे आयोजन करणे.
-
प्रचार-प्रसिद्धी: शहरात ठिकठिकाणी समागमाची माहिती देणारे फलक लावणे आणि जनजागृती करणे.
-
आरोग्य सुविधा: समागमाच्या निमित्ताने शहरातील विविध वस्त्यांमध्ये आरोग्य शिबिरे आयोजित करणे.
या बैठकीस उपमहापौर शर्मिला बाबर, अतिरिक्त आयुक्त विक्रांत बगाडे, उप आयुक्त अण्णा बोदडे, ममता शिंदे, संदीप खोत, राजेश आगळे, तसेच सामाजिक कार्यकर्ते सुनिल चटोले, मोहन बिलडान, नरेंद्र टाक, गुरुद्वारा प्रबंधक गुरूमलसिंह, सुरिंदर सिंह नडीवाल, गुरूविंदरसिंह गिल, गोबिंदसिंह धावडा, एम. टी. भोरे आणि विविध सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.
