कर्करोगाच्या चौथ्या टप्प्यावर मात करून ६३ वर्षीय रुग्णाला परत मिळाला आवाज! तळेगावच्या ‘ओएलसीसी’मध्ये स्वरयंत्र वाचवण्यात डॉक्टरांना यश; आधुनिक उपचारांनी जीवन सुसह्य
पिंपरी चिंचवड प्रतिनिधी बालाजी नवले, २० फेब्रुवारी २०२६ | मॅक्स मंथन डेली न्यूज:
पिंपरी : कर्करोगाचे नाव ऐकले तरी अनेकांच्या पायाखालची वाळू सरकते, त्यातच तो चौथ्या टप्प्यात असेल तर जगण्याची आशा धुसर होते. मात्र, पिंपरी-चिंचवडमधील एका ६३ वर्षीय रुग्णाने आधुनिक ‘प्रिसिजन ऑन्कोलॉजी’ उपचारांच्या जोरावर घशाच्या कर्करोगावर यशस्वी मात केली आहे. तळेगाव दाभाडे येथील टीजीएच ऑन्को लाईफ कॅन्सर सेंटर (ओएलसीसी) मध्ये करण्यात आलेल्या उपचारांमुळे या रुग्णाचे स्वरयंत्र (लॅरिंक्स) वाचवण्यात यश आले असून, त्यांना त्यांचा गमावलेला आवाज पुन्हा प्राप्त झाला आहे.
तंबाखूचे सेवन करणाऱ्या राजाराम सावंत (नाव बदलले आहे) यांना गेल्या काही महिन्यांपासून आवाज बसण्याचा त्रास जाणवत होता. तसेच मानेच्या उजव्या बाजूला एक वेदनारहित गाठ आली होती. सुरुवातीला दुर्लक्ष केल्याने त्यांचा आवाज इतका क्षीण झाला की त्यांना लोकांशी बोलणेही कठीण झाले. यामुळे ते मानसिकदृष्ट्या खचले होते. अखेर त्यांनी ओएलसीसीमध्ये वैद्यकीय सल्ला घेतला, जो त्यांच्या आयुष्याला कलाटणी देणारा ठरला.
रेडिएशन ऑन्कोलॉजीचे संचालक डॉ. गौरव जसवाल आणि युनिट प्रमुख डॉ. संतोष साहू यांनी या उपचारांविषयी माहिती दिली.
-
तपासणी: PET-CT तपासणीत उजव्या बाजूच्या पायरिफॉर्म सायनस भागात कर्करोग आढळला, जो स्वरयंत्रापर्यंत पसरला होता.
-
उपचार पद्धती: मल्टिडिसिप्लिनरी ट्युमर बोर्डाने रुग्णासाठी ‘मेडिकल केमो रेडिएशन’ सुचवले. यामध्ये आधुनिक हेलिकल टोमोथेरपी आणि सिस्प्लॅटिन केमोथेरपीचा वापर करण्यात आला.
-
उद्दिष्ट: स्वरयंत्र काढून न टाकता (Organ-preserving) कर्करोग मुळापासून संपवणे.
अवघ्या १६ आठवड्यांच्या उपचारानंतर रुग्णाचा आवाज कर्करोग होण्यापूर्वीपेक्षाही अधिक स्पष्ट झाला आहे. मानेतील लिम्फ नोड्स पूर्णपणे नाहीसे झाले असून रुग्ण आता सामान्य जीवन जगत आहे. “आधुनिक कर्करोग उपचार केवळ आयुष्य वाढवत नाहीत, तर आयुष्याचा दर्जाही सुधारतात याचे हे उत्तम उदाहरण आहे,” असे डॉ. जसवाल यांनी नमूद केले.
या यशस्वी उपचारांमुळे कर्करुग्णांमध्ये एक मोठी आशा निर्माण झाली आहे. वेळेत निदान आणि योग्य तंत्रज्ञानाचा वापर केल्यास घशाच्या चौथ्या टप्प्यातील कर्करोगावरही मात करणे शक्य आहे, हे या घटनेतून सिद्ध झाले आहे.
© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

