शिवरायांचा एक विचारही जीवनात क्रांती घडवू शकतो! व्याख्याते अविनाश भारती यांनी उलगडले शिवचरित्राचे पैलू; संभाजीनगरमध्ये ‘विचार प्रबोधन पर्व’ उत्साहात
पिंपरी प्रतिनिधी आकाश कांबळे, २० फेब्रुवारी २०२६ | मॅक्स मंथन डेली न्यूज:
पिंपरी : “छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ इतिहासातील राजे नसून ते भविष्यातील पिढ्यांसाठी मार्गदर्शक आहेत. त्यांच्या अथांग शिवचरित्रातील केवळ एक विचार जरी आपण प्रामाणिकपणे आत्मसात केला, तर प्रत्येक व्यक्ती आपल्या आयुष्यात निश्चितपणे यशस्वी होऊ शकते,” असे प्रतिपादन सुप्रसिद्ध व्याख्याते अविनाश भारती यांनी केले.
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने आयोजित ‘छत्रपती शिवाजी महाराज विचार प्रबोधन पर्व २०२६’ अंतर्गत चिंचवडमधील संभाजीनगर येथे ‘आदर्श राजे छत्रपती शिवाजी महाराज’ या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. यावेळी भारती यांनी शिवरायांच्या व्यवस्थापन कौशल्यापासून ते त्यांच्या व्यापक सामाजिक दृष्टिकोनाचे सखोल विश्लेषण केले.
१५ ते २१ फेब्रुवारी या कालावधीत शहरात ठिकठिकाणी प्रबोधन पर्वाचे आयोजन करण्यात आले आहे. महापौर रवि लांडगे, उपमहापौर शर्मिला बाबर आणि आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविला जात आहे. संभाजीनगर येथील कार्यक्रमात अविनाश भारती यांनी आजच्या धावपळीच्या युगात शिवरायांचे सुशासन आणि ध्येयनिष्ठा कशी उपयुक्त आहे, हे विविध ऐतिहासिक प्रसंगांच्या माध्यमातून मांडले.
कार्यक्रमास उपस्थित मान्यवर:
या व्याख्यानास माजी महापौर मंगला कदम, नगरसेविका अनुराधा गोरखे, सुप्रिया चांदगुडे, नगरसेवक कुशाग्र कदम, उपायुक्त अण्णा बोदडे यांची प्रमुख उपस्थिती होती. या कार्यक्रमासाठी साई किरण मित्र मंडळाचे मोलाचे सहकार्य लाभले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मंडळाचे अध्यक्ष विशाल नारखेडे, उपाध्यक्ष अजित कोडलकर, गिरीश तेलंग, गौरव कदम, कार्याध्यक्ष संजय कलागते, खजिनदार निलेश नारखेडे आणि सहखजिनदार मंगेश गुंजाळ यांनी विशेष परिश्रम घेतले. शिवरायांच्या पराक्रमासोबतच त्यांच्या लोककल्याणकारी विचारांची मांडणी करणाऱ्या या व्याख्यानाला शिवप्रेमींनी मोठी गर्दी केली होती.
© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

