news
Home पिंपरी चिंचवड “२९० शब्द मालकाचे असले तरी १० शब्द सत्याचे असावेत!” मंजुल भारद्वाज यांनी मांडली पत्रकारितेची मूल्ये

“२९० शब्द मालकाचे असले तरी १० शब्द सत्याचे असावेत!” मंजुल भारद्वाज यांनी मांडली पत्रकारितेची मूल्ये

सोशल मीडिया हाच आता सत्तेला जाब विचारण्याचा प्रभावी पर्याय; ज्येष्ठ पत्रकार अविनाश चिलेकर यांचे प्रतिपादन, हनुमंत पवार यांच्यावरील हल्ल्याचा जाहीर निषेध. (@ २०२६ | मॅक्स मंथन डेली न्यूज)

by maxmanthannews@gmail.com
Spread the love

‘सत्यासाठी जगणारा तोच खरा पत्रकार!’; ख्यातनाम नाटककार मंजुल भारद्वाज यांचे परखड विचार; पत्रकारितेच्या सद्यस्थितीवर ओढले ताशेरे


पिंपरी प्रतिनिधी आकाश कांबळे, २४ फेब्रुवारी २०२६ | मॅक्स मंथन डेली न्यूज:

पिंपरी : “सत्य शोधणारा आणि त्या सत्यासाठी जगणारा माणूस म्हणजे पत्रकार होय. आजच्या काळात आपण गॅलिलिओसारखी स्पष्ट भूमिका मांडू शकतो का? हा प्रश्न प्रत्येक माध्यमकर्मीने स्वतःला विचारला पाहिजे,” असे परखड मत मुंबईचे ख्यातनाम अभिनेते, लेखक व दिग्दर्शक मंजुल भारद्वाज यांनी व्यक्त केले.  राष्ट्रसंत गाडगेबाबा महाराज यांच्या १५० व्या जयंतीचे औचित्य साधून आयोजित ‘पत्रकार तुम्ही, आम्ही, आपण सर्व’ या विशेष व्याख्यानात ते बोलत होते.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ पत्रकार अविनाश चिलेकर होते. या संवाद चर्चेत माध्यम क्षेत्रातील अनेक दिग्गज आणि अभ्यासक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

मंजुल भारद्वाज यांनी आपल्या ओघवत्या शैलीत पत्रकारितेच्या बदलत्या स्वरूपावर भाष्य केले. ते म्हणाले की, “चिकित्सा करणे हीच खरी पत्रकारिता आहे. जर ३०० शब्दांची बातमी असेल, तर त्यातील २९० शब्द मालकाचे असले तरी किमान १० शब्द हे सत्याचे आणि स्वतःचे असले पाहिजेत. जे निर्माण करतो ते विचार असतात आणि जो विध्वंस करतो तो विकार असतो.” यावेळी त्यांनी ऐतिहासिक संदर्भासह लोकशाहीतील माध्यमांच्या भूमिकेवर प्रकाश टाकला.

अध्यक्षीय भाषणात अविनाश चिलेकर यांनी सध्याच्या माध्यम परिस्थितीवर चिंता व्यक्त केली. ते म्हणाले, “प्रश्न विचारणारा आणि सत्तेला जाब विचारणारा पत्रकार आज हरवत चालला आहे. प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडियावरील दबावाच्या काळात प्रत्येकाने सोशल मीडियाचा वापर सत्यासाठी केला पाहिजे. भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव यांचा आदर्श समोर ठेवून पत्रकारांनी काम करण्याची गरज आहे.”

या कार्यक्रमास पत्रकार विजय जगताप, भाई विशाल जाधव, मुजफ्फर इनामदार, दादाराव आढाव, विकास कडलक, अविनाश कांबीकर, दिलीप देहाडे, विकास साळवी, आकाश कांबळे, श्याम सोनवणे, निलेश सायंकर, प्रताप गुरव, माजी नगरसेवक मारुती भापकर, शरद जाधव, अनिल सूर्यवंशी, नरेंद्र सोनटक्के, रवींद्र दुधेकर, वसंत साळवी, प्रल्हाद कांबळे, विजय गायकवाड आणि विष्णू मांजरे उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या शेवटी, काँग्रेस प्रवक्ते हनुमंत पवार यांच्यावर झालेल्या भ्याड हल्ल्याचा ज्येष्ठ नगरसेवक मारुती भापकर यांनी उपस्थितांच्या वतीने तीव्र निषेध केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गिरीश वाघमारे यांनी केले, तर परिचय विजय बोत्रे यांनी करून दिला. आभार भाई विशाल जाधव यांनी मानले.


© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!