पिंपरी-चिंचवडमध्ये ‘लोककलेचा’ सन्मान! पद्मश्री रघुवीर खेडकर यांचा नागरी सत्कार; “हा केवळ माझा नव्हे, तर तमाशावर प्रेम करणाऱ्या प्रत्येक कलावंताचा गौरव”
पिंपरी प्रतिनिधी आकाश कांबळे, २८ फेब्रुवारी २०२६ | मॅक्स मंथन डेली न्यूज:
पिंपरी : “कष्टकऱ्यांची उद्योगनगरी म्हणून ओळख असलेल्या पिंपरी-चिंचवड शहराने माझा नागरी सन्मान करून प्रत्यक्षात महाराष्ट्राच्या मातीतील सर्व तमाशा कलावंतांचा गौरव केला आहे. आयुष्यभर ज्या कलेने मला ओळख दिली, त्या रंगभूमीची सेवा मी शेवटच्या श्वासापर्यंत करत राहीन,” अशा शब्दांत ज्येष्ठ तमाशा कलावंत पद्मश्री रघुवीर तुकाराम खेडकर यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
मराठी भाषा गौरव दिनानिमित्त पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात खेडकर यांचा महापौर रवि लांडगे यांच्या हस्ते मानपत्र, भक्ती-शक्ती समूह शिल्पाची प्रतिकृती आणि सन्मानचिन्ह देऊन भव्य नागरी सत्कार करण्यात आला.
आपल्या मनोगतात खेडकर यांनी अनेक आठवणींना उजाळा दिला. ते म्हणाले, “तमाशामध्ये वेगळेपण आणण्यासाठी मी तीन वर्षे शास्त्रीय संगीताचे धडे घेतले आणि ते तमाशात समाविष्ट केले. माझी आई मी डॉक्टर व्हावं अशी इच्छा बाळगून होती, पण परिस्थितीअभावी पाचवीतच शाळा सोडावी लागली आणि आईसोबत तमाशाचा प्रवास सुरू झाला. स्वतः छोट्या खोलीत राहिलो, पण सहकाऱ्यांना पक्की घरे उभी करून दिली याचा अधिक आनंद आहे.” यावेळी त्यांनी कुसुमाग्रजांच्या भेटीचाही आवर्जून उल्लेख केला.
महापौर रवि लांडगे यांनी खेडकर यांच्या कार्याचा गौरव करताना सांगितले की, “मराठी भाषेला अभिजात दर्जा प्राप्त झाला असून ही भाषा संघर्षातून समृद्ध झाली आहे. याच मराठी भाषेला आणि ग्रामीण संस्कृतीला खेडकर यांनी आपल्या लोककलेच्या माध्यमातून केवळ देशातच नव्हे, तर परदेशातही पोहोचवले. त्यांनी केवळ मनोरंजन केले नाही, तर समाजप्रबोधनाचे मोठे कार्य केले आहे.”
विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर यांनी खेडकर यांचा उल्लेख ‘आधुनिक लोककलेची गंगोत्री’ असा केला. “पूर्वी लोककला वर्तमानपत्राचे काम करत होती. खेडकर यांनी परंपरा न सोडता ती अधिक प्रगल्भ केली आहे. हा सन्मान केवळ त्यांचा नसून संपूर्ण शहराचा सन्मान आहे,” असे त्यांनी नमूद केले.
उपमहापौर शर्मिला बाबर यांनीही खेडकर यांच्या कार्यामुळे नव्या पिढीला प्रेरणा मिळेल, असा विश्वास व्यक्त केला.
या सोहळ्याला नगरसेविका सुप्रिया चांदगुडे, अनुराधा गोरखे, माजी नगरसेवक मारुती भापकर, अरुण बोऱ्हाडे, विशेष अधिकारी किरण गायकवाड, आयटीआयचे प्राचार्य शशिकांत पाटील, शफी शेख आणि मोठ्या संख्येने रसिक प्रेक्षक उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक किरण गायकवाड यांनी केले, तर परिचय राजू मोहन यांनी करून दिला.
© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.


