सामान्य नागरिक केंद्रबिंदू; शहराच्या विकासाची नवी संरचना आखणार! सभापती संजय नाना काटे यांचा शहर सुधारणा बैठकीत महत्त्वपूर्ण निर्णय
पिंपरी चिंचवड प्रतिनिधी: बालाजी नवले, १० मार्च २०२६ | मॅक्स मंथन डेली न्यूज:
पिंपरी : “पिंपरी-चिंचवड शहराचा विकास करताना केवळ सिमेंट-काँक्रीटची बांधकामे न करता, सामान्य नागरिकांचे जीवनमान सुधारणे हेच आमचे मुख्य ध्येय आहे. आरोग्य, स्वच्छता आणि पर्यावरण या त्रिसूत्रीवर आधारित शहर सुधारण्याची सर्वसमावेशक संरचना (Framework) आम्ही तयार करणार आहोत,” अशी माहिती शहर सुधारणा समितीचे सभापती संजय नाना काटे यांनी दिली.
महापालिकेच्या मुख्य प्रशासकीय इमारतीमधील मधुकरराव पवळे सभागृहात पार पडलेल्या समितीच्या बैठकीत ते बोलत होते.
-
मोशी वेस्ट टू एनर्जी प्रकल्प: शहराच्या वाढत्या कचऱ्याचा प्रश्न निकाली काढण्यासाठी मोशी येथे उभारण्यात येत असलेल्या दुसऱ्या ‘वेस्ट टू एनर्जी’ प्रकल्पाच्या कामाला गती देण्याचे निर्देश देण्यात आले. या प्रकल्पामुळे पर्यावरणाचे रक्षण होऊन कचऱ्यापासून वीजनिर्मिती होणार आहे.
-
झोपडपट्टी पुनर्वसन व सुविधा: झोपडपट्टी भागातील नागरिकांना मूलभूत सोयीसुविधा पुरविणे आणि पात्र लाभार्थ्यांना हक्काची सदनिका (घर) उपलब्ध करून देण्याबाबत संबंधित विभागांना सूचना देण्यात आल्या.
-
नदी संरक्षण व अतिक्रमण: शहरातील पवना आणि इंद्रायणी नद्यांच्या काठावरील बेकायदेशीर अतिक्रमणे तातडीने हटवून नदीपात्राचे प्रदूषण रोखण्यासाठी कडक कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले.
-
सुलभ व्यापार प्रक्रिया: शहरातील उद्योग आणि व्यापाराला चालना देण्यासाठी आवश्यक परवानग्यांची प्रक्रिया अधिक पारदर्शक आणि ‘सिंगल विंडो’ पद्धतीने सुलभ करण्यावर चर्चा झाली.
शहराच्या विकास आराखड्या संदर्भातील प्रलंबित हरकती आणि सूचना लवकरात लवकर निकाली काढण्याच्या सूचना सभापतींनी दिल्या. यामुळे नियोजित रस्ते आणि सार्वजनिक आरक्षणांची कामे मार्गी लागून शहराचा नियोजनबद्ध विकास होण्यास मदत होईल.
या बैठकीस माजी महापौर वैशाली घोडेकर-लोंढे, नगरसदस्या वैशाली काळभोर, अर्चना सस्ते, नगरसदस्य डॉ. सुहास कांबळे, उत्तमराव केंदळे, अनंत कोऱ्हाळे यांच्यासह मुख्य अभियंता संजय कुलकर्णी, उपायुक्त अण्णा बोदडे आणि इतर अधिकारी उपस्थित होते.
© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव।


