पिंपरी-चिंचवड पोलिसांची उत्तर प्रदेशापर्यंत फिल्मी स्टाईल पाठलाग! ५० लाखांच्या खंडणीसाठी अपहरण केलेल्या व्यापाऱ्याची सुखरूप सुटका; ५ आरोपींना बेड्या
पिंपरी चिंचवड , १० मार्च २०२६ | मॅक्स मंथन एक्सक्लुझिव्ह:
पिंपरी/काळेवाडी : ५० लाख रुपयांच्या खंडणीसाठी एका व्यापाऱ्याचे अपहरण करून त्यांना उत्तर प्रदेशात नेणाऱ्या टोळीचा पिंपरी-चिंचवड पोलिसांनी थरारक पाठलाग करून पर्दाफाश केला आहे. खंडणी विरोधी पथक, गुंडा विरोधी पथक आणि काळेवाडी पोलिसांनी संयुक्त कारवाई करत पाच सराईत गुन्हेगारांना अटक केली असून, अपहृत व्यक्तीची सुखरूप सुटका केली आहे.
रहाटणी येथील लॅन्टन हॉटेलसमोरील लेनमधून फिर्यादी यांच्या भावाचे (व्यापारी) ५ अनोळखी इसमांनी काळ्या रंगाच्या स्विफ्ट कारमधून (UP-70-9272) जबरदस्तीने अपहरण केले होते. आरोपींनी फिर्यादीला फोन करून ५० लाख रुपयांच्या खंडणीची मागणी केली आणि पैसे न दिल्यास भावाला जिवें मारण्याची धमकी दिली होती. याप्रकरणी काळेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा (रजि. नं. १०१/२०२६) दाखल करण्यात आला होता.
घटनेचे गांभीर्य ओळखून पोलीस आयुक्त आणि सह-पोलीस आयुक्त डॉ. विशाल हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली पथके तयार करण्यात आली. सीसीटीव्ही फुटेज आणि मोबाईल लोकेशनच्या तांत्रिक विश्लेषणावरून आरोपी अपहृत व्यक्तीला घेऊन उत्तर प्रदेशच्या दिशेने जात असल्याचे निष्पन्न झाले.
तपासादरम्यान आरोपींनी खंडणीचे पैसे घेण्यासाठी फिर्यादीला आळेफाटा येथे बोलावले होते. पोलिसांनी तेथे सापळा लावला, मात्र आरोपींनी जागा बदलली. त्यानंतर अहिल्यानगरचे पोलीस अधीक्षक श्री. सोमनाथ घार्गे यांच्या मदतीने संगमनेर विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. कुणाल सोनवणे यांच्या पथकाने संगमनेर टोलनाक्यावर सापळा रचला आणि आरोपींच्या कारला वेढा घातला.
अटक केलेले आरोपी (सर्व राहणार उत्तर प्रदेश):
१) चंद्रशेखर दीपचंद गौड (वय ३४, जि. आजमगड)
२) दिलीप मोहनलाल सरोज (वय २८, जि. प्रतापगड)
३) रिंकू अलगुराम सरोज (वय २०, जि. प्रतापगड)
४) अनिल गिरधारीलाल सरोज (वय २६, जि. प्रतापगड)
५) मुकेशकुमार राममूरत चमार (वय २४, जि. प्रतापगड)
पोलिसांनी हस्तगत केलेले साहित्य:
-
२ देशी बनावटीचे पिस्तूल आणि ६ जिवंत काडतुसे.
-
गुन्ह्यात वापरलेली स्विफ्ट कार (UP-70-HR-9272).
-
५ मोबाईल फोन आणि फिर्यादीचे ७ लाख रुपये किमतीचे घड्याळ.
ही कारवाई गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक सुनील भदाणे, प्रदीप गोडांबे, विजय नलगे, ज्ञानेश्वर कुहाडे आणि काळेवाडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र बहिरट, सुरेंद्र धुमाळ यांच्यासह गुंडा विरोधी पथकातील अधिकारी व अंमलदारांनी केली आहे.
© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव।
