भगतसिंगांच्या स्वप्नातील भारत घडवणे हीच खरी आदरांजली! पुतणे किरणजीत सिंग यांचे पिंपरीत भावूक उद्गार; ‘शहीद राजगुरूंच्या मातोश्रींना वंदन करण्यासाठी पुण्यात आलो’
पिंपरी-चिंचवड प्रतिनिधी: बालाजी नवले, २० मार्च २०२६ | मॅक्स मंथन विशेष:
पिंपरी : “शहीद भगतसिंग हे केवळ क्रांतीकारक नव्हते, तर ते एक थोर मानवतावादी आणि समतावादी विचारवंत होते. त्यांना केवळ ब्रिटिशांना घालवून स्वातंत्र्य नको होते, तर त्यांना पिळवणूकमुक्त संपूर्ण व्यवस्था बदलायची होती. आज देशात होणाऱ्या शेतकरी आत्महत्या आणि वाढता जातीवाद पाहिला असता, भगतसिंग निश्चितच व्यथित झाले असते,” असे प्रतिपादन शहीद भगतसिंग यांचे पुतणे किरणजीत सिंग यांनी केले.
पिंपरी कॅम्प येथील आर्य समाज भवन येथे “शहीद भगतसिंग आणि आर्य समाज” या विषयावर आयोजित व्याख्यानात ते बोलत होते. यावेळी आर्य समाजाचे अध्यक्ष सुरेंद्र करमचंदानी, मारुती भापकर, अतुल आचार्य आणि इतर मान्यवर उपस्थित होते.
व्याख्यानादरम्यान किरणजीत सिंग यांनी एक अत्यंत हृदयस्पर्शी आठवण सांगितली. २४ मार्च ऐवजी २३ मार्च १९३१ रोजी भगतसिंग, सुखदेव आणि राजगुरू यांना फाशी देण्यात आली. त्यावेळी पुण्यातून शहीद राजगुरूंच्या मातोश्री पार्वतीबाई या लाहोरला गेल्या होत्या. “ब्रिटिशांनी भगतसिंगांच्या आईला त्यांची भेट घेऊ दिली नाही, याच्या निषेधार्थ पार्वतीबाईंनी स्वतःच्या मुलाची (राजगुरूंची) अंतिम भेट घेतली नाही. एका मातेचा सन्मान राखण्यासाठी स्वतःच्या पुत्राची भेट नाकारणाऱ्या या राष्ट्रप्रेमी मातेला नमन करण्यासाठीच मी पुणे मुक्कामी आलो आहे,” असे भावूक उद्गार त्यांनी काढले.
-
बालपणावरील संस्कार: भगतसिंगांवर बालपणी गुरुगोविंद सिंग, महर्षी दयानंद सरस्वती, छत्रपती शिवाजी महाराज आणि राणी लक्ष्मीबाई यांच्या विचारांचा मोठा प्रभाव होता.
-
जालियनवाला बाग ते क्रांती: वयाच्या १२ व्या वर्षी जालियनवाला बाग हत्याकांडातील रक्ताने माखलेली माती घरी नेऊन त्यांनी देश स्वातंत्र्याची शपथ घेतली होती.
-
आर्य समाजाची भूमिका: महर्षी दयानंद सरस्वती यांच्या २०० व्या जयंतीनिमित्त आर्य समाजाचे विचार आणि क्रांतीकारकांचे चरित्र नव्या पिढीने अभ्यासावे, असे आवाहन त्यांनी केले.
या कार्यक्रमाला मंत्री हरेश तिलोकचंदानी, सचिव संजय वासवानी, समन्वयक डॉ. नयनकुमार आचार्य, नलिनी देशपांडे, राजाभाऊ गोलांडे, सुहास पोफळे आदींसह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उत्तम दंडीमे यांनी केले, तर आभार अतुल आचार्य यांनी मानले.
© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव।


