पिंपरी चिंचवडमध्ये प्लास्टिक वापरणाऱ्यांवर महापालिकेचा मोठा प्रहार; एकाच दिवसात ३१ हजारांचा दंड वसूल
पिंपरी चिंचवड प्रतिनिधी बालाजी नवले, २३ मार्च २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:
पिंपरी: पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या ‘क’ क्षेत्रीय कार्यालयांतर्गत आरोग्य विभागाने प्लास्टिक वापर आणि अस्वच्छतेविरोधात जोरदार मोहीम उघडली आहे. शहराला प्लास्टिकमुक्त करण्यासाठी प्रशासनाने कंबर कसली असून, नुकत्याच झालेल्या धडक कारवाईत नियमबाह्य प्लास्टिक वापरणाऱ्या नागरिक व व्यावसायिकांकडून एकूण ३१ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.
ही कारवाई महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी, अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे, उप आयुक्त डॉ. प्रदीप ठेंगल, सहा. आयुक्त किरणकुमार मोरे आणि क्षेत्रीय अधिकारी अजिंक्य येळे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. मुख्य आरोग्य निरीक्षक वैभव घोळवे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने विविध प्रभागांमध्ये ही धडक मोहीम राबवली.
-
इंद्रायणी नगर (प्रभाग क्रमांक ०८): येथे प्लास्टिक वापरणाऱ्या व्यावसायिकांवर कारवाई करून १० हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. तसेच ५ किलो प्रतिबंधित प्लास्टिक साहित्य जप्त करण्यात आले. याच परिसरात अस्वच्छता पसरवणाऱ्या आणि कचरा टाकणाऱ्यांवर कारवाई करत अतिरिक्त ८ हजार रुपयांचा दंड आकारण्यात आला.
-
नेहरू नगर (प्रभाग क्रमांक ०९): या भागात करण्यात आलेल्या कारवाईत १३ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला असून ३ किलो प्लास्टिक जप्त करण्यात आले आहे.
या मोहिमेत आरोग्य सहाय्यक गीता रिल, जगदीश चिंचोलीकर यांच्यासह अन्य महापालिका अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सक्रिय सहभाग घेतला. महापालिकेच्या या आक्रमक पवित्र्यामुळे प्लास्टिकचा बेकायदेशीर वापर करणाऱ्या विक्रेत्यांचे धाबे दणाणले आहेत.
“शहरात प्लास्टिक वापर आणि अस्वच्छतेविरोधात महापालिका सातत्याने कठोर कारवाई करत आहे. पर्यावरण संरक्षण आणि नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने प्लास्टिकमुक्त शहराची संकल्पना राबविणे अत्यंत महत्त्वाचे आहे. नागरिकांनी कचरा व्यवस्थापन नियमांचे काटेकोर पालन करून सहकार्य करावे.”
– डॉ. प्रदीप ठेंगल (उप आयुक्त, आरोग्य विभाग)
“प्लास्टिक बंदीचे नियम मोडणाऱ्यांवर यापुढेही अशाच प्रकारे कडक कारवाई करण्यात येईल. शहरातील पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी व्यावसायिकांनी वसुंधरापूरक पर्यायांचा अवलंब करावा. नियमांचे उल्लंघन केल्यास दंडात्मक कारवाईसोबतच पुढील कठोर पावले उचलली जातील.”
– किरणकुमार मोरे (सहाय्यक आयुक्त, पीसीएमसी)
शहराला स्वच्छ आणि प्रदूषणमुक्त ठेवण्यासाठी नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन क्षेत्रीय अधिकारी अजिंक्य येळे यांनी केले आहे.
© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

