खुनाच्या गुन्ह्यातील आरोपीचे उदात्तीकरण करणाऱ्यांवर अकोला पोलिसांची मोठी कारवाई; इन्स्टाग्रामवर पोस्ट टाकणे पडले महागात
अकोला /मुर्तिजापुर प्रतिनिधी विलास सावळे, २३ मार्च २०२६, मॅक्स मंथन डेली न्यूज:
अकोला: अकोला येथील डाबकी रोड पोलीस स्टेशनच्या हद्दीत घडलेल्या एका खुनाच्या गुन्ह्यातील मुख्य आरोपीला प्रोत्साहन देणाऱ्या आणि दोन धर्मांत तेढ निर्माण करणाऱ्या इन्स्टाग्राम पोस्टवर अकोला पोलिसांनी तात्काळ कारवाई केली आहे. सोशल मीडिया मॉनिटरिंग सेलच्या सतर्कतेमुळे या प्रकरणातील दोन आरोपींना अटक करण्यात आली असून एकाचा शोध सुरू आहे.
डाबकी रोड पोलीस स्टेशनमध्ये दाखल असलेल्या खुनाच्या गुन्ह्यातील (अप.क्र. २३४/२६) मुख्य आरोपी अर्जुन नरेंद्र धनावत (रा. आश्रय नगर, अकोला) याने केलेल्या कृत्याचे उदात्तीकरण करणाऱ्या पोस्ट इन्स्टाग्रामवर व्हायरल झाल्या होत्या. आरोपी १) यश गोविंद शर्मा (वय २३, रा. साईनगर, डाबकी रोड) आणि २) निरंज मंगलसिंग ठाकूर (वय १९, रा. शिव नगर, डाबकी रोड) यांनी मुख्य आरोपीचा फोटो अपलोड करून दोन जातींमध्ये तेढ निर्माण होईल, अशा आशयाचा मजकूर प्रसारित केला होता. यामुळे मृताच्या नातेवाईकांच्या आणि विशिष्ट धर्मीयांच्या भावना दुखावल्या गेल्या.
तसेच, आरोपी क्र. ३ सज्जाद खान याने या पोस्टला उद्देशून दोन समाजांमध्ये भडका उडवण्याच्या उद्देशाने प्रतिकात्मक पोस्ट व्हायरल केली. यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेता, पोलिसांनी स्वतःहून फिर्याद देऊन तिन्ही आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
पोलीस अधीक्षक कार्यालयातील ‘सोशल मीडिया मॉनिटरिंग सेल’च्या ही बाब निदर्शनास येताच त्यांनी तांत्रिक माहितीच्या आधारे संबंधित पोलीस स्टेशनला माहिती दिली. या माहितीवरून डाबकी रोड पोलिसांनी तत्परतेने यश शर्मा आणि निरंज ठाकूर यांच्यावर कायदेशीर कारवाई केली, तर तिसऱ्या आरोपीचा शोध अद्याप सुरू आहे.
या प्रकरणी आरोपींविरुद्ध डाबकी रोड पोलीस स्टेशनमध्ये अप.क्र. २३५/२०२६, कलम १९६(१)(ब), २९९, ३(५) बीएनएस सह कलम ७६ आयटी ॲक्टनुसार गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक अचिंत चांडक, अपर पोलीस अधीक्षक बी. चंद्रकांत रेड्डी, उपविभागीय अधिकारी सुदर्शन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक दीपक कोळी, सपोनि अभिषेक अंधारे, पोउपनि अनिल चव्हाण, सपोउपनि दीपक तायडे, पिंपरी चिंचवड प्रतिनिधी बालाजी नवले, पोहवा उमेश पाटील, प्रेम कश्यप, मंगेश इंगळे, उमेश सुगंधी, प्रवीण इंगळे, नापोकों राजेश ठाकूर, मंगेश गिते आणि रामेश्वर मानकर यांनी यशस्वीरीत्या पार पाडली.
© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.
