पिंपरी-चिंचवडच्या विकासाला ‘स्थायी’ची गती! पीएमपीएमएलचा सातवा वेतन आयोग, नवीन शौचालये आणि जलशुद्धीकरण प्रकल्पांना मंजुरी
पिंपरी-चिंचवड प्रतिनिधी: बालाजी नवले, २६ मार्च २०२६ | मॅक्स मंथन विशेष:
पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहरातील नागरी सुविधा, सार्वजनिक वाहतूक आणि आरोग्य विभागाशी संबंधित विविध विकासकामांना आज महानगरपालिकेच्या स्थायी समिती बैठकीत मंजुरी देण्यात आली. स्थायी समितीचे सभापती अभिषेक बारणे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत कोट्यवधींच्या खर्चासह महत्त्वपूर्ण प्रस्तावांवर शिक्कामोर्तब करण्यात आले.
या बैठकीला महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी, अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे, तृप्ती सांडभोर आणि स्थायी समितीचे सर्व सदस्य उपस्थित होते.
-
पीएमपीएमएल कामगारांना दिलासा: पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (PMPML) सेवकांना सातव्या वेतन आयोगाचा फरकाचा दुसरा हप्ता देण्यासाठी, सन २०२५-२६ च्या संचलन तुटीपोटीची अग्रीम रक्कम अदा करण्यास मान्यता देण्यात आली.
-
सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प: चिखली येथील ५ दशलक्ष लिटर क्षमतेच्या ‘अल्ट्राफिल्ट्रेशन प्लांट’मधून प्रक्रिया केलेले सांडपाणी पुरविण्याच्या महत्त्वपूर्ण प्रस्तावास मंजुरी मिळाली.
-
स्वच्छता आणि आरोग्य: प्रभाग क्रमांक ७ मधील शांतीनगर आणि प्रभाग ८ मधील बालाजीनगर येथील जुनी व मोडकळीस आलेली सामुदायिक शौचालये पाडून त्या ठिकाणी अद्ययावत नवीन शौचालये उभारली जाणार आहेत.
-
शाश्वत दळणवळण: शहरात सायकलिंगला प्रोत्साहन देण्यासाठी आणि सायकल ट्रॅकच्या कामासाठी ‘बीआयसीआय’ (BICI) संस्थेकडून प्राप्त झालेल्या अनुदानातून सल्लागार नेमणूक व इन्फ्रास्ट्रक्चरच्या खर्चास मान्यता देण्यात आली.
-
वैद्यकीय भरती: महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये मनुष्यबळाची कमतरता भासू नये म्हणून विविध वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची कंत्राटी पद्धतीने नियुक्ती करण्याचा निर्णय घेण्यात आला.
बैठकीत शहरातील जलतरण तलाव भाडेतत्त्वावर चालविण्यास देणे, क्षेत्रीय कार्यालयांच्या धुरीकरणासाठी (Fogging) फॉग मशिनसह वाहने भाड्याने घेणे, तसेच प्रशासकीय कामकाजासाठी आवश्यक लॅपटॉप खरेदी करणे अशा विविध विषयांना सभापती अभिषेक बारणे यांनी मंजुरी दिली.
या सभेला स्थायी समिती सदस्य शालिनी गुजर, मनीषा चिंचवडे, संदीप कस्पटे, सारिका गायकवाड, योगिता नागरगोजे, कृष्णा सुरकुले, अर्चना करांडे, मधुरा शिंदे, बाबासाहेब त्रिभुवन, सविता आसवानी, संतोष कोकणे, संदीप वाघेरे, विकास साने, सुलभा उबाळे आणि नगरसचिव मुकेश कोळप उपस्थित होते.
© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव।
