पिंपरी-चिंचवडच्या स्वच्छतेसाठी ‘एलपीएसी’चे बळ! दापोडी शून्य कचरा प्रकल्पाला मिळाले अत्याधुनिक संकलन वाहन; प्लास्टिक मुक्तीसाठी महापालिकेचे ठोस पाऊल
पिंपरी प्रतिनिधी आकाश कांबळे, २७ मार्च २०२६ | मॅक्स मंथन विशेष:
पिंपरी : पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेने प्लास्टिक कचरा व्यवस्थापन अधिक सक्षम करण्यासाठी ‘समुदायांच्या माध्यमातून प्लास्टिक कृती स्थानिकीकरण’ (LPAC) या अभिनव उपक्रमांतर्गत मोठे पाऊल उचलले आहे. दापोडी येथील विकेंद्रित साहित्य पुनर्प्राप्ती केंद्रात (MRF) आयोजित एका विशेष कार्यक्रमात आरोग्य विभागाला अत्याधुनिक प्लास्टिक कचरा संकलन वाहन सुपूर्द करण्यात आले.
या उपक्रमामुळे शहरातील कचरा व्यवस्थापनाला नवी चालना मिळणार असून, कचरा संकलनाची प्रक्रिया अधिक गतिमान आणि शाश्वत होणार आहे.
महापौर रवि लांडगे, उपमहापौर शर्मिला बाबर, आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी आणि अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे यांच्या मार्गदर्शनाखाली हा सोहळा पार पडला. यावेळी उपायुक्त डॉ. प्रदीप ठेंगल, क्षेत्रीय अधिकारी पूजा दूधनाळे, सहाय्यक आरोग्य अधिकारी अंकुश झिटे, श्रीराम गायकवाड, मुख्य आरोग्य निरीक्षक उद्धव डवरी यांच्यासह युनिसेफ (UNICEF) आणि युमिकोअर ऑटोकॅट इंडियाचे प्रतिनिधी उपस्थित होते.
‘एलपीएसी’ (LPAC) प्रकल्पाची अंमलबजावणी ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ लोकल सेल्फ गव्हर्नमेंट, मुंबई यांच्यामार्फत केली जात असून, यात युनिसेफ महाराष्ट्र आणि युमिकोअर ऑटोकॅट इंडिया प्रा. लि. यांचे तांत्रिक व आर्थिक सहकार्य लाभले आहे.
-
सहभाग: स्थानिक समुदायाच्या सक्रिय सहभागातून प्लास्टिक कचऱ्याचे संकलन, वर्गीकरण आणि पुनर्वापर (Recycle) करणे हा याचा मुख्य उद्देश आहे.
-
आढावा: मान्यवरांनी यावेळी साहित्य पुनर्प्राप्ती केंद्राची (MRF Centre) पाहणी केली आणि स्वयं-सहायता गटातील महिला व विद्यार्थ्यांशी संवाद साधून त्यांच्या कार्याचे कौतुक केले.
“एलपीएसी सारख्या उपक्रमांमुळे कचरा व्यवस्थापनात नागरिकांचा थेट सहभाग वाढत आहे. शाश्वत आणि पर्यावरणपूरक शहर उभारणीसाठी महापालिका अशा प्रयोगांना नेहमीच प्रोत्साहन देईल.”
— डॉ. विजय सूर्यवंशी, आयुक्त, पिंपरी-चिंचवड महापालिका
“प्लास्टिक कचरा व्यवस्थापन ही केवळ प्रशासनाची जबाबदारी नसून ती लोकचळवळ व्हायला हवी. या नव्या वाहनामुळे स्थानिक स्तरावर कचऱ्याचे वर्गीकरण आणि पुनर्वापर सुलभ होईल.”
— डॉ. प्रदीप ठेंगल, उपायुक्त, पिंपरी-चिंचवड महापालिका
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक उत्कर्षा कवडी यांनी केले तर सूत्रसंचालन प्राची मेढे यांनी केले. यावेळी आरोग्य निरीक्षक सचिन जाधव, युनिसेफचे जसप्रीत गुरुम, आनंद घोडके आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव।

