पिंपरी-चिंचवडच्या विकासकामांना स्थायी समितीची गती; आरोग्य, पाणीपुरवठा आणि पायाभूत सुविधांच्या प्रस्तावांना मंजुरी
पिंपरी चिंचवड प्रतिनिधी बालाजी नवले, दिनांक: ३१ मार्च २०२६, मॅक्स मंथन डेली न्यूज:
पिंपरी: पिंपरी-चिंचवड शहराच्या सर्वांगीण विकासाला अधिक वेग देण्यासाठी आज झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत आरोग्य, पाणीपुरवठा आणि पायाभूत सुविधांशी संबंधित अनेक महत्त्वपूर्ण प्रस्तावांना मंजुरी देण्यात आली. महापालिकेच्या मुख्य प्रशासकीय भवनात सभापती अभिषेक बारणे यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडली.
या बैठकीस स्थायी समिती सदस्य शालिनी गुजर, मनीषा चिंचवडे, संदीप कस्पटे, सारिका गायकवाड, योगिता नागरगोजे यांच्यासह अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे, विक्रांत बगाडे आणि विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
बैठकीत पिंपरी येथील नवीन जिजामाता रुग्णालयातील विद्युत देखभाल व दुरुस्ती कामांच्या खर्चाला मान्यता देण्यात आली. तसेच, ‘फ’ क्षेत्रीय कार्यालयांतर्गत महापालिका शाळा आणि सरकारी इमारतींमधील नादुरुस्त इन्व्हर्टर व बॅटरी बदलणे, नवीन इन्व्हर्टर बसवणे यांसारख्या कामांना मंजुरी देऊन शैक्षणिक सुविधा बळकट करण्यावर भर देण्यात आला.
शहराचा पाणीपुरवठा खंडित होऊ नये यासाठी रावेत येथील अशुद्ध जलउपसा केंद्रातील १६०० किलोवॅट क्षमतेच्या रोहित्र संच (Transformer) व ब्रेकर्सच्या दुरुस्तीचा खर्च मंजूर करण्यात आला. तसेच सेक्टर १० मध्ये पर्यायी ट्रान्सफॉर्मर बसवणे आणि विविध पंपिंग हाऊसमध्ये ‘सॉफ्ट स्टार्टर’ बसवण्याच्या प्रस्तावांनाही समितीने हिरवा कंदील दाखवला.
-
रस्ते विकास: भोसरी (कासारवाडी) येथील स.नं. ४९८ मधील १२ मीटर रुंद रस्त्यासाठी भूसंपादन करण्यास मान्यता देण्यात आली.
-
संक्रमण शिबिर: झोपडपट्टीधारकांच्या तात्पुरत्या पुनर्वसनासाठी चिंचवड येथील सुमारे ३० हजार चौ. फूट जागा ३ वर्षांसाठी भाडेतत्त्वावर घेण्यास मंजुरी मिळाली.
-
दुरुस्ती कामे: सांगवी-किवळे रस्त्यावरील बस थांब्यांची दुरुस्ती, कासारवाडी मैलाशुद्धीकरण केंद्राची सीमाभिंत आणि विविध प्रभागांतील स्वच्छतागृह दुरुस्तीच्या कामांना गती देण्यात आली आहे.
राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रमांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी १९ टाटा सुमो किंवा तत्सम वाहने २ वर्षांसाठी भाडेतत्त्वावर घेण्यास मंजुरी देण्यात आली. तसेच, PMPML च्या सन २०२४-२५ मधील संचलन तुटीच्या लेखापरीक्षण अहवालाच्या अवलोकनासाठीचा खर्चही मान्य करण्यात आला.
“शहराच्या हिताचे हे सर्व प्रकल्प कालबद्ध मर्यादेत पूर्ण करण्याच्या सूचना प्रशासनाला देण्यात आल्या आहेत. आरोग्य सुविधांचे सक्षमीकरण, पाणीपुरवठा यंत्रणेतील सुधारणा आणि रस्ते विकास यावर आम्ही विशेष भर दिला आहे. नागरिकांना अखंडित सेवा मिळावी हाच आमचा मुख्य उद्देश आहे.”
— अभिषेक बारणे, सभापती, स्थायी समिती, पिंपरी चिंचवड महानगरपालिका.
© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

