पिंपरी-चिंचवड: मासाहेब मीनाताई ठाकरे जलतरण तलावाची निविदा रद्द; ‘एल-१’ आणि ‘एल-२’ ठेकेदारांच्या वादाचा फटका
पिंपरी चिंचवड प्रतिनिधी आकाश कांबळे , दिनांक: ३० मार्च २०२६,मॅक्स मंथन डेली न्यूज:
पिंपरी: पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक १३ मधील मासाहेब मीनाताई ठाकरे जलतरण तलावाच्या कामकाजासाठी काढण्यात आलेली निविदा प्रक्रिया अखेर रद्द करण्यात आली आहे. ठेकेदारांमधील वाद आणि कायदेशीर गुंतागुंत टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला असून, आता नव्याने निविदा प्रक्रिया राबविण्यात येणार असल्याची माहिती स्थायी समितीचे सभापती अभिषेक बारणे यांनी दिली.
सदर निविदेवरून स्थायी समितीमध्ये दोन गटांत मतभेद निर्माण झाले होते. समिती सदस्या सुलभा उबाळे आणि अर्चना कारंडे यांच्यात निविदेच्या तांत्रिक बाबींवरून चर्चा रंगली होती. विशेषतः ‘एल-१’ (सर्वात कमी दर देणारा) आणि ‘एल-२’ (दुसऱ्या क्रमांकाचा) ठेकेदारांच्या पात्रतेबाबत वाद निर्माण झाला होता. हा वाद भविष्यात न्यायालयीन प्रक्रियेत अडकून जलतरण तलाव दीर्घकाळ बंद राहू नये, यासाठी प्रशासनाने ही निविदाच रद्द करण्याचा पवित्रा घेतला.
सध्या उन्हाळ्याचा हंगाम सुरू असल्याने नागरिकांची गैरसोय होऊ नये, यासाठी सभापती अभिषेक बारणे यांनी महत्त्वपूर्ण सूचना केली आहे. नवीन निविदा प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत हा जलतरण तलाव बंद न ठेवता, महापालिकेचे इतर १२ जलतरण तलाव चालवणाऱ्या अनुभवी ठेकेदाराकडे या तलावाची जबाबदारी तात्पुरत्या स्वरूपात सोपविली जाणार आहे. यामुळे ऐन उन्हाळ्यात पोहण्यासाठी येणाऱ्या नागरिकांना फटका बसणार नाही.
या निर्णयाबाबत बोलताना सुलभा उबाळे म्हणाल्या, “निविदा प्रक्रियेत पारदर्शकता राखणे ही महापालिकेची नैतिक जबाबदारी आहे. प्रक्रियेत त्रुटी राहिल्यास त्याचा परिणाम कामावर होतो. मात्र, हे करत असताना नागरिकांना मिळणाऱ्या सुविधा खंडित होऊ नयेत, यासाठी तात्पुरती व्यवस्था करणे अत्यंत आवश्यक होते.”
ऐन उन्हाळ्यात जलतरण तलाव सुरू राहावेत आणि व्यवस्थापन चोख असावे, यासाठी प्रशासनाने विशेष दक्षता घेण्याचे निर्देश स्थायी समितीने दिले आहेत.
© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.
