बार्शीटाकळीत १७ वर्षीय मुलीचा बालविवाह रोखला; बनावट आधार कार्डद्वारे वय वाढवण्याचा डाव फसला
अकोला / मुर्तिजापूर प्रतिनिधी विलास सावळे, दिनांक: ३० मार्च २०२६, मॅक्स मंथन डेली न्यूज:
बार्शीटाकळी (अकोला): कायद्याचे रक्षणकर्ते आणि सामाजिक संस्थांच्या सतर्कतेमुळे एका अल्पवयीन मुलीचे आयुष्य उद्ध्वस्त होण्यापासून वाचले आहे. बार्शीटाकळी पोलीस स्टेशनच्या हद्दीतील एका गावात १७ वर्षीय मुलीचा २४ वर्षीय तरुणासोबत होणारा बालविवाह जिल्हा महिला व बालविकास कार्यालय, ‘चाईल्ड लाईन’ आणि ‘ॲसेस टू जस्टीस’ (ISWS) अकोला टीमने धाडसी कारवाई करत रोखला आहे.
या प्रकरणातील धक्कादायक बाब म्हणजे, मुलीचे वय मूळ आधार कार्डवर १७ वर्षे असताना, लग्नासाठी तिचे वय वाढवून दाखवणारे बनावट आधार कार्ड तयार करण्यात आले होते. मुलगी शिक्षणापासून वंचित असून, १७ वर्षे वय होईपर्यंत तिला शाळेत दाखलच करण्यात आले नव्हते.
‘ॲसेस टू जस्टीस’ आय. एस. डब्ल्यू. एस. अकोला टीमला एका १७ वर्षीय बालिकेचा विवाह २४ वर्षीय व्यक्तीशी ठरल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे चाईल्ड लाईन आणि संबंधित पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली. तपासात बनावट आधार कार्डचा प्रकार उघडकीस आला. त्यानंतर मुलीच्या पालकांना ग्रामपंचायत कार्यालयात पाचारण करण्यात आले.
हे प्रकरण अकोला येथील बाल कल्याण समितीसमोर मांडण्यात आले. समितीने दोन्ही पक्षांची बैठक घेऊन ‘बालविवाह प्रतिबंधक अधिनियम २००६’ बद्दल सविस्तर माहिती दिली. अल्पवयीन वयात लग्न केल्यास मुलीच्या शारीरिक, मानसिक आणि शैक्षणिक आयुष्यावर होणाऱ्या गंभीर दुष्परिणामांची जाणीव करून देण्यात आली. तसेच, १८ वर्षे पूर्ण झाल्याशिवाय लग्न करणे हा कायदेशीर गुन्हा असल्याचे स्पष्ट करण्यात आले.
दोन्ही बाजूंच्या पालकांकडून “मुलीचे वय १८ वर्षे पूर्ण झाल्याशिवाय तिचे लग्न लावणार नाही” अशा आशयाचे कायदेशीर हमीपत्र लिहून घेण्यात आले. या प्रक्रियेत ग्रामपंचायत सचिव, अंगणवाडी सेविका आणि आशा वर्कर यांना साक्षीदार म्हणून घेण्यात आले. तसेच, मुलीला तातडीने शाळेत दाखल करण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत.
ही यशस्वी कारवाई बाल कल्याण समितीच्या अध्यक्षा ऍड. अनिता गुरव, सदस्य राजेश देशमुख, डॉ. विनय दांदळे, ऍड. शिला तोषनिवाल, प्रांजली जयस्वाल, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी राजू लाडुलकर, चाईल्ड लाईन समन्वयक हर्षाली गजभिये, जिल्हा प्रकल्प समन्वयक शंकर वाघमारे आणि पूजा मनवर यांच्या सतर्कतेमुळे पार पडली. या पथकाच्या कामगिरीचे संपूर्ण जिल्ह्यात कौतुक होत आहे.
© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.
