news
Home पिंपरी चिंचवड अंत्योदय आणि राष्ट्रभक्ती हीच भाजपची ओळख! शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे यांचे प्रतिपादन

अंत्योदय आणि राष्ट्रभक्ती हीच भाजपची ओळख! शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे यांचे प्रतिपादन

पिंपळे सौदागरमध्ये भाजप स्थापना दिन उत्साहात; बापू काटे यांच्या हस्ते ध्वजारोहण आणि कार्यकर्त्यांना 'जनसंपर्काचा' मंत्र | © २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज

by maxmanthannews@gmail.com
Spread the love

दोन खासदारांपासून ‘विश्वविजेता’ पक्षापर्यंतचा प्रवास! शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे यांनी उलगडला भाजपचा ४६ वर्षांचा देदिप्यमान इतिहास

 

 

 

पिंपरी चिंचवड प्रतिनिधी आकाश कांबळे , दिनांक: ६ एप्रिल २०२६, मॅक्स मंथन डेली न्यूज:

पिंपळे सौदागर: “भारतीय जनता पार्टीची पाळेमुळे १९५१ च्या जनसंघात दडलेली आहेत. १९७७ च्या आणीबाणीतील संघर्ष आणि १९८० ची स्थापना ते आज जगातील सर्वात मोठा राजकीय पक्ष, हा प्रवास कोट्यवधी कार्यकर्त्यांच्या त्यागाचा आणि समर्पणाचा आहे,” असे प्रतिपादन भाजप शहराध्यक्ष तथा नगरसेवक श्री. शत्रुघ्न (बापू) काटे यांनी केले.

भारतीय जनता पार्टीच्या ४६ व्या स्थापना दिनानिमित्त पिंपळे सौदागर येथील शत्रुघ्न काटे जनसंपर्क कार्यालयात आयोजित विशेष सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी पक्षाच्या अधिकृत ध्वजाचे पूजन करून शहराध्यक्षांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.

कार्यकर्त्यांना संबोधित करताना शत्रुघ्न काटे म्हणाले की, ६ एप्रिल १९८० रोजी स्थापन झालेली भाजप आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली विश्वविजेता पक्ष बनली आहे. श्रद्धेय स्व. अटलबिहारी वाजपेयी, लालकृष्ण अडवाणी यांच्यापासून सुरू झालेला हा प्रवास आज अमित शाह आणि नितीन नवीन यांच्यापर्यंत यशस्वीपणे पोहोचला आहे. ४६ वर्षांपूर्वी लावलेले हे छोटेसे रोपटे आज एका विशाल वटवृक्षात रूपांतरित झाले असून, अंत्योदयाचा विचार आणि राष्ट्रभक्ती हीच या पक्षाची खरी ओळख असल्याचे त्यांनी नमूद केले.

पक्षाच्या ४६ व्या वर्षातील पदार्पणाचे औचित्य साधून श्री. काटे यांनी सर्व कार्यकर्त्यांना ‘जनसंपर्क वाढवा’ असा मंत्र दिला. “केवळ ध्वजाला नमन करणे पुरेसे नाही, तर ज्या कार्यकर्त्यांनी पक्ष उभा करण्यासाठी आयुष्य खर्ची घातले, त्यांच्या वारशाचा अभिमान बाळगत केंद्र सरकारच्या जनहितार्थ योजना समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवणे हीच खरी सेवा ठरेल,” असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

या ऐतिहासिक सोहळ्याप्रसंगी नगरसेविका सौ. अनिताताई काटे, नगरसेविका सौ. कुंदाताई भिसे, श्री. जयनाथशेठ काटे, श्री. संजयशेठ भिसे, श्री. संदेश काटे (पाटील), श्री. बबनजी डांगले, डॉ. श्री. अमितजी नेमाणे, श्री. दिनेश काटे (पाटील) यांच्यासह स्थानिक पदाधिकारी, सक्रिय कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. ‘भारतीय जनता पार्टीचा विजय असो’ आणि ‘भारत माता की जय’ अशा घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणून गेला होता.


© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!