नियोजनबद्ध कामकाज आणि प्रभावी अंमलबजावणीमुळे मालमत्ता कर संकलनात विक्रमी वाढ – महापौर रवि लांडगे
पिंपरी चिंचवड प्रतिनिधी बालाजी नवले, दिनांक: ७ एप्रिल २०२६, मॅक्स मंथन डेली न्यूज
पिंपरी: “नियोजनबद्ध कामकाज, काटेकोर अंमलबजावणी आणि वेळेवर घेतलेल्या धाडसी निर्णयामुळे पिंपरी चिंचवड महापालिकेच्या मालमत्ता कर संकलनात यंदा उल्लेखनीय वाढ झाली आहे. या यशाचे खरे मानकरी करसंकलन विभागातील अधिकारी, कर्मचारी आणि रात्रंदिवस कष्ट घेणाऱ्या महिला बचत गटाच्या भगिनी आहेत,” असे गौरवपूर्ण उद्गार महापौर रवि लांडगे यांनी काढले.
आर्थिक वर्ष २०२५-२६ मध्ये मालमत्ता कर संकलनात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या १८ विभागीय कार्यालयातील कर्मचारी आणि अधिकाऱ्यांचा सत्कार समारंभ निगडी येथील ग. दि. माडगूळकर नाट्यगृहात पार पडला. यावेळी आगामी वर्षाच्या बिल वाटप मोहिमेसाठी महिला बचत गटांच्या विशेष कार्यशाळेचेही आयोजन करण्यात आले होते.
महापौर म्हणाले की, शहराच्या प्रगतीत महिलांचा वाटा अत्यंत महत्त्वाचा आहे. मागील वर्षी महिला बचत गटांनी केलेल्या नियोजनबद्ध बिल वाटपामुळे यंदा ५ लाखांहून अधिक मालमत्ताधारकांनी ऑनलाईन पद्धतीने कर भरला आहे. तसेच ‘अभय योजने’चा सुमारे ७० हजार नागरिकांनी लाभ घेतला असून, यामुळे महापालिकेच्या तिजोरीत भर पडली आहे.
उपमहापौर शर्मिला बाबर यांनी सांगितले की, ‘सिद्धी’ ॲपच्या माध्यमातून कर प्रक्रिया अधिक पारदर्शक आणि आधुनिक झाली आहे. गेल्या तीन वर्षांत ६०० हून अधिक महिलांना या माध्यमातून घरपोच बिल वाटपाचा रोजगार मिळाला असून, त्या आता शहराच्या विकास प्रक्रियेतील महत्त्वाच्या भागीदार बनल्या आहेत. स्थायी समिती सभापती अभिषेक बारणे यांनी ९६१ कोटींच्या विक्रमी वसुलीचे कौतुक करत, महिला बचत गट हे महापालिकेच्या महसुलाचा मजबूत पाया असल्याचे नमूद केले.
आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी माहिती दिली की, १८ विभागीय कार्यालयांमध्ये ‘परफॉर्मर ऑफ द डे’ सारख्या स्पर्धा राबविल्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये उत्साह निर्माण झाला. पिंपरी चिंचवड ही देशातील एकमेव महापालिका आहे जी बचत गटांच्या माध्यमातून बिल वाटप करते. या महिलांना अधिक सक्षम करण्यासाठी आगामी काळात ‘अर्बन सरस महोत्सवा’चे आयोजन केले जाईल.
कर संकलन मोहिमेत उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल निगडी, आकुर्डी, चिंचवड, थेरगाव, सांगवी, पिंपरी-वाघेरे, पिंपरी नगर, मनपा भवन, फुगेवाडी-दापोडी, भोसरी, चऱ्होली, मोशी, चिखली, तळवडे, किवळे, दिघी-बोपखेल, वाकड आणि कस्पटेवस्ती या कार्यालयांचा सन्मान करण्यात आला.
यावेळी उपायुक्त सचिन पवार, प्रशासन अधिकारी सुचेता कुलकर्णी, रश्मी देशपांडे, संजय तळपाडे, जयवंत निरगुडे आणि जनसंपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक यांचाही विशेष सत्कार करण्यात आला.
टाटा स्ट्राईव्ह आणि समाज विकास विभागाच्या ‘सक्षम’ प्रकल्पांतर्गत ६०० हून अधिक महिलांना ‘सिद्धी’ ॲप आणि ‘गो ग्रीन’ उपक्रमांतर्गत ई-बिल वाटपाचे तांत्रिक प्रशिक्षण देण्यात आले.
© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.



