राळेगाव येथे गॅस सिलेंडरसाठी ग्राहकांच्या रांगा; शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आक्रमक, प्रशासनाला दिले निवेदन
यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी: नरेश राऊत, दिनांक: ७ एप्रिल २०२६, मॅक्स मंथन डेली न्यूज:
राळेगाव: शासनाकडून एलपीजी सिलेंडरसाठी ई-केवायसी (e-KYC) अनिवार्य करण्यात आल्याने आणि जागतिक युद्धजन्य परिस्थितीमुळे सिलेंडरचा तुटवडा भासण्याच्या भीतीपोटी राळेगाव येथील गॅस एजन्सींसमोर ग्राहकांच्या लांबच लांब रांगा लागत आहेत. या पार्श्वभूमीवर ग्राहकांची होणारी हेळसांड थांबवण्यासाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने तहसील कार्यालयातील पुरवठा विभागाला निवेदन देऊन तातडीने उपाययोजना करण्याची मागणी करण्यात आली आहे.
राळेगाव शहरात दोन मुख्य गॅस एजन्सी असून त्यांच्याकडे राळेगाव शहर व तालुक्यातील सुमारे २५ हजारांहून अधिक नोंदणीकृत ग्राहक आहेत. मात्र, एजन्सींकडे असलेल्या अपुऱ्या कर्मचारी वर्गामुळे दिवसाला केवळ ४० ते ५० ग्राहकांचीच केवायसी पूर्ण होत आहे. यामुळे दूरवरच्या खेड्यापाड्यातून आलेले मजूर, महिला आणि वृद्ध नागरिकांना तासनतास उन्हात उभे राहावे लागत असून, काम पूर्ण न होताच रिकाम्या हाती परतावे लागत आहे.
शिवसेनेचे तालुकाप्रमुख विजय पाटील आणि शहर प्रमुख शंकर गायधने यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने निरीक्षण अधिकारी चंद्रकांत पाटील (अन्न व नागरी पुरवठा विभाग) यांची भेट घेऊन खालील मागण्या मांडल्या:
-
गावपातळीवर कॅम्प: केवायसीसाठी ग्राहकांना शहरात येण्याऐवजी गाव किंवा खेड्यांच्या ठिकाणी विशेष कॅम्प लावून प्रक्रिया पूर्ण करावी.
-
पिण्याच्या पाण्याची व सावलीची सोय: वाढता उन्हाळा लक्षात घेता एजन्सीसमोर तात्पुरता मंडप उभारून पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करावी.
-
कर्मचारी संख्या वाढवा: केवायसी प्रक्रिया गतीने पूर्ण करण्यासाठी एजन्सीने तात्काळ अतिरिक्त कर्मचारी नियुक्त करावेत.
-
पुरेसा साठा: तालुक्यात सिलेंडरचा तुटवडा भासणार नाही याची पुरवठा विभागाने दक्षता घ्यावी.
-
घरपोच सेवा: सिलेंडरची घरपोच सेवा अधिक सक्षम करावी जेणेकरून एजन्सीवरील गर्दी कमी होईल.
यावेळी महिला आघाडीच्या पार्वता मुखरे, उप तालुका प्रमुख प्रशांत वारेकर, उपशहर प्रमुख योगेश मलोंढे, श्रीकांत कोदाणे, सुनील क्षिरसागर, महेंद्र तुमाने, महादेव मुखरे, देवराव नाखले, सुधाकर शिखरे, धनराज श्रीरामे, रोशन उताणे यांच्यासह मोठ्या संख्येने शिवसैनिक उपस्थित होते. निवेदनावर वैशाली ठोंबरे, विनायक नगराळे, प्रवीण चांदेकर, प्रभाकर धोटे यांच्यासह अनेक नागरिकांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
प्रशासनाने यावर तातडीने तोडगा न काढल्यास आंदोलनाचा पवित्रा घेण्याचे संकेतही पक्षाकडून देण्यात आले आहेत.
© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

