शहराचे सौंदर्य व स्वच्छता राखण्यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे; आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांचे आवाहन
पिंपरी चिंचवड प्रतिनिधी आकाश कांबळे, दिनांक: ७ एप्रिल २०२६, मॅक्स मंथन डेली न्यूज:
पिंपरी: पिंपरी-चिंचवड शहराची शिस्त आणि सौंदर्य अबाधित राखणे ही केवळ प्रशासनाचीच नव्हे, तर प्रत्येक नागरिकाची प्राथमिक जबाबदारी आहे. अनधिकृत जाहिरात फलक, बॅनर्स आणि सार्वजनिक भिंतींवरील जाहिरातींमुळे शहराचे विद्रुपीकरण होत असून, अशा प्रकारांविरुद्ध आता महापालिका प्रशासनाने आक्रमक पवित्रा घेतला आहे. शहर विद्रुपीकरण करणाऱ्यांवर कडक कायदेशीर आणि दंडात्मक कारवाईचा इशारा आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी दिला आहे.
महानगरपालिका हद्दीतील सार्वजनिक ठिकाणी, टेलिफोनचे खांब, महावितरणचे डीपी आणि भिंतींवर अनधिकृतपणे फ्लेक्स व जाहिराती चिकटवल्या जात असल्याचे निदर्शनास आले आहे. हे रोखण्यासाठी सर्व क्षेत्रीय अधिकारी, विभागप्रमुख आणि बीट निरीक्षकांना नियमित पाहणी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
आयुक्तांनी दिलेल्या सूचनांनुसार, अनधिकृत जाहिरातींवर नमूद केलेल्या मोबाईल क्रमांकांचा शोध घेऊन संबंधित जाहिरातदारांना तत्काळ नोटिसा बजावण्यात येणार आहेत. तसेच, महावितरण डीपी किंवा भिंतींवर जाहिरात करणाऱ्या कंपन्यांवर कडक कारवाई करण्यात येईल. महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम व संबंधित कायद्यांनुसार हा प्रकार नियमबाह्य असून, अनधिकृत फलक हटवण्याचा खर्चही संबंधित जाहिरातदाराकडूनच वसूल केला जाणार आहे.
-
नियमित पाहणी: क्षेत्रीय अधिकाऱ्यांनी आपल्या कार्यक्षेत्रात दररोज पाहणी करून अनधिकृत बॅनर्स हटवावेत.
-
दंडात्मक कारवाई: नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर जागेवरच दंड आकारला जाईल.
-
कायदेशीर प्रक्रिया: वारंवार नियम मोडणाऱ्या संस्था किंवा व्यक्तींवर पोलीस तक्रार दाखल करण्याची शक्यता.
“नागरिक आणि जाहिरातदारांनी शहर स्वच्छ ठेवण्यासाठी महापालिकेस सहकार्य करावे. अनधिकृतरित्या जाहिरात फलक किंवा बॅनर्स लावणे टाळावे. अन्यथा संबंधित फलक हटवून त्वरित दंडात्मक कारवाई करण्यात येईल. महापालिका प्रशासन शहराच्या सौंदर्यीकरणासाठी आणि शिस्तबद्ध जाहिरात व्यवस्थेसाठी कटिबद्ध असून सर्वांनी नियमांचे पालन करणे आवश्यक आहे.”
– डॉ. विजय सूर्यवंशी, आयुक्त, पिंपरी चिंचवड महानगरपालिका
© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

