पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाची ताकद वाढली; ताफ्यात ८ नवीन स्कॉर्पिओ आणि ४२ दुचाकी दाखल!
पिंपरी चिंचवड प्रतिनिधी आकाश कांबळे, १० एप्रिल २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:
पिंपरी: पिंपरी-चिंचवड पोलीस दलाच्या आधुनिकीकरणासाठी आणि गस्तीमध्ये सुसूत्रता आणण्यासाठी पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांच्या पुढाकाराने पोलीस ताफ्यात मोठी वाढ करण्यात आली आहे. जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून मंजूर झालेल्या ०८ नवीन स्कॉर्पिओ एन आणि ४२ होंडा ॲक्टिव्हा दुचाकी वाहनांचा ताफ्यात समावेश करण्यात आला आहे.
पोलीस आयुक्तालयाच्या स्थापनेपासूनच पोलीस दलाला सुसज्ज करण्यासाठी आयुक्त विनय कुमार चौबे सतत प्रयत्नशील आहेत. त्यांच्या कार्यकाळात मनुष्यबळ वाढवणे, परिमंडळ व विभागांची फेररचना करणे, नवीन पोलीस ठाण्यांची निर्मिती आणि आधुनिक साधनसामग्री उपलब्ध करून देण्यावर भर दिला जात आहे. या आधुनिकीकरणाचाच एक भाग म्हणून ८ एप्रिल २०२६ रोजी ही नवीन वाहने पोलीस दलात दाखल झाली.
पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांनी पदभार स्वीकारला तेव्हा आयुक्तालयाकडे एकूण ३१९ वाहने उपलब्ध होती. यामध्ये १८० मोटारसायकल, १२ कार, १०९ जीप, १२ लाईट व्हॅन आणि ०६ बसचा समावेश होता. शहराचा विस्तार आणि वाढती गुन्हेगारी रोखण्यासाठी ही संख्या अपुरी होती.
आयुक्तांनी पोलीस महासंचालक कार्यालय आणि जिल्हा नियोजन समितीकडे सतत पाठपुरावा केल्यामुळे आता एकूण ३६७ अतिरिक्त वाहने उपलब्ध झाली आहेत. यामध्ये:
-
जिल्हा नियोजन समितीमार्फत: २६३ वाहने (१०२ मोटारसायकल, १५७ जीप, ३ लाईट व्हॅन आणि १ ट्रक). यामध्ये २५ मोटारसायकल बजाज कंपनीने पुरस्कृत केल्या आहेत.
-
पोलीस महासंचालक कार्यालयामार्फत: १०४ वाहने (७१ मोटारसायकल, २ कार, १ जीप, १६ लाईट व्हॅन, १३ बस आणि १ टँकर).
पोलीस ताफ्यात वाहनांची संख्या वाढल्यामुळे गस्त वाढवणे, गुन्हेगारांचा तातडीने पाठलाग करणे आणि कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांपर्यंत कमीत कमी वेळात पोहोचणे पोलिसांना सुलभ होणार आहे. या प्रभावी वाहन व्यवस्थेमुळे पोलीस सेवा अधिक सक्षम आणि परिणामकारक झाली आहे.
© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.



